esakal | ‘महानिर्मिती’ची वीजकेंद्रे व्हेंटिलेटरवर
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

‘महानिर्मिती’ची वीजकेंद्रे व्हेंटिलेटरवर

sakal_logo
By
निलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : गेल्या सहा महिन्यांत विक्रमी वीज निर्मिती करणारी महानिर्मिती कंपनी कोळशाअभावी व्हेंटिलेटरवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सातही वीज केंद्र अत्यंत बिकट परिस्थितीत असून एक ते पाच दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती संथ सुरू असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात कोळसा तुटवड्यामुळे वीज निर्मिती त अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व वीज केंद्रात १५ दिवस ते २० दिवसांचा कोळसा साठविला जातो. परंतु यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी या प्रकारचे नियोजनच न केल्याने महानिर्मितीवर हे संकट ओढवले आहे. (Nashik News)

हेही वाचा: स्ट्रॉबेरीला पर्याय म्हणून रासबेरीची शेती

जिथे रोज २० लाख टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना फक्त चार लाख कोळशाचा पुरवठा होत आहे. कोरड्या कोळशाचा साठा हाताशी नसल्यास इंधन तेलाची मागणी वाढेल. यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चात व प्रदूषणातही वाढ होईल व परिणामी वीज निर्मिती दरात वाढ होण्‍याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यात महानिर्मितीचे सात औष्णिक वीज केंद्र आहेत. राज्याची मागणी या कालावधीत २१ हजार ७२ मेगावॉट होती तर सर्व स्रोतांतून वीज निर्मिती १३ हजार ४१४ मेगावॉट सुरू होती तर केंद्राकडून (एनटीपीसी) सात हजार ५८४ मेगावॉटचा हिस्सा मागणीच्या काळात आठ रुपये दराने खरेदी करून गरज भागवली जात होती. कोळसा तुटवड्यामुळे राज्यात अनेक भागांत भारनियमनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. खाणींमध्ये पाणी शिरल्याने अडचणी येत आहेत. लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल व कोळसा पुरवठा सुरळीत होईल.

-पुरुषोत्तम जाधव, संचालक , खनिकर्म

केंद्रातील शिल्लक कोळसा (टनात)

  1. नाशिक : ५२००

  2. कोराडी : ८७५००

  3. खापरखेडा : १,१५,०००

  4. परळी : १६३००

  5. पारस : १६५००

  6. चंद्रपूर : १७१०००

  7. भुसावळ : २२५००

loading image
go to top