पान दहा
--------------------
बाईक-टॅक्सीसाठी ईव्हीला प्राधान्य
परिवहन विभागाचे धोरण, रोजगार संधी मिळणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ः महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि तात्पुरता (प्रोव्हिजनल) बाइक-टॅक्सी परवाना असलेल्या व्यावसायिकांसाठी निर्देश जारी केले आहेत. याअंतर्गत बाइक-टॅक्सी ताफ्यांना सध्याच्या पेट्रोल वाहनांवरून शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी टप्प्याटप्प्याने संक्रमण कालावधी निश्चित केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यांना बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचे आवाहन केले. यातून सुमारे ८ कोटी व्यक्तींना रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे.
एक ऑक्टोबरला जारी परिपत्राद्वारे, महाराष्ट्र परिवहन विभागाने ''महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५'' अंतर्गत अर्ज करणाऱ्या किंवा तात्पुरता परवाना मिळालेल्या ऍग्रीगेटर्स यांना त्यांच्या ताफ्यात १०० टक्के इलेक्ट्रिक बाइकचा समावेश करण्यासाठी दोन टप्प्यांत नऊ महिन्यांच्या कालावधीला मंजुरी दिली आहे. सुरुवातीचे सहा महिने आणि त्यानंतर तीन महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ असेल.
मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच राज्यांना खासगी दुचाकी वाहनांना बाईक टॅक्सी म्हणून चालवण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते. या निर्णयामुळे, विशेषतः उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देत, सुमारे ८ कोटी लोकांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.
बाईक टॅक्सी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या बाइक-टॅक्सी आराखड्याच्या अंमलबजावणीत व्यावहारिक आणि दूरदर्शी दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतो. १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याकडे वळण्यासाठी टप्प्याटप्प्याने संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय, राज्याची स्वच्छ वाहतुकीची उद्दिष्टे ठामपणे कायम ठेवत, अंमलबजावणीतील प्रत्यक्ष परिस्थितीचाही विचार करतो.
------------
या शहरांमध्ये सेवा
पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी कमी अंतराच्या प्रवासासाठी तसेच मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके, बस थांबे, महाविद्यालये आणि रोजगार केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरतील. तसेच, आपल्याकडील दुचाकीचा वापर करून घरखर्चाला हातभार लावू इच्छिणाऱ्यांना त्या कमाईच्या लवचिक संधी देऊ शकतात, असे नमूद केले आहे.