पान एक
-----------------
कळवणला मका खरेदीच्या आमिषाने
शेतकऱ्यांना नऊ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
कळवण ता.१७ : शासकीय योजनेच्या माध्यमातून बियाणे, खते व कीटकनाशकांवर अनुदान मिळवून देण्यासह उत्पादित शेतमालाला हमीभाव देऊन खरेदी करण्याचे आमिष दाखवत मका उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ९ लाख ५६ हजार १०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार अभोणा परिसरात उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून हजारो किलो मका खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढेच नव्हे, तर पहिल्या हप्त्यापोटी दिलेला ९३ हजार ८०० रुपयांचा धनादेशही बँकेत वटला नसल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
याप्रकरणी वरखेडा येथील हिम्मत विष्णू पवार यांनी तक्रारीवरून ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाचे अध्यक्ष सुनील बाबुराव कसाळे, कर्मचारी संगीता बोर्डे, किरण अर्णे, समाधान महाराज, अमोल चौधरी, श्याम वामन गावित, विदर्भ सीड कंपनीचे मॅनेजर स्वप्निल देशमुख, एरिया मॅनेजर सुजित झा आणि व्हिक्टोरिया मार्वेल सीड्स इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक गुलाम जिलानी खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पवार यांच्या तक्रारीनुसार ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी परिसरातील शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांवर अनुदान मिळवून देण्याबरोबरच उत्पादित मका हमीभावाने खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. त्यानंतर शेतमाल विक्रीसाठी संबंधित समूहाच्या प्रतिनिधींशी कंपनीने संपर्क साधला. दोन टप्प्यांत १८ हजार किलोहून अधिक मक्याची खरेदी एप्रिल व मे २०२६ या कालावधीत विदर्भ सीड कंपनी आणि व्हिक्टोरिया मार्वेल सीड्स इंडिया प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींमार्फत झाली. या मक्याची एकूण किंमत ९ लाख ५६ हजार १०० रुपये होती. शेतमाल विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांची प्रतीक्षा सुरू झाली. सुरुवातीला पैसे लवकर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, वारंवार विचारणा करूनही संबंधितांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
-------
धनादेश न वटल्याने नुकसान
शेतमालाचे पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी ९३ हजार ८०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र, हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो वटला नाही. त्यामुळे केवळ पैसे देण्यास टाळाटाळ होत नसून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय अधिक बळावला.