esakal | चिंता कायमच! मालेगावच्या 'या' भागात नियमांचे पालन करूनही अपयश; तर 'पूर्व' भाग कोरोनामुक्तीच्या दिशेने
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात मालेगाव शहरातील पूर्व भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र दोन महिन्यांतच या भागातील रुग्णसंख्या विविध उपाययोजनांमुळे आटोक्यात आली. यामुळे कोरोनाची भीती गेली. स्थानिक डॉक्टर उपचारासाठी पुढे आले. त्यामुळे पूर्वेची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होऊन दिलासा मिळाला आहे. मात्र याच टप्प्यात...

चिंता कायमच! मालेगावच्या 'या' भागात नियमांचे पालन करूनही अपयश; तर 'पूर्व' भाग कोरोनामुक्तीच्या दिशेने

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात मालेगाव शहरातील पूर्व भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र दोन महिन्यांतच या भागातील रुग्णसंख्या विविध उपाययोजनांमुळे आटोक्यात आली. यामुळे कोरोनाची भीती गेली. स्थानिक डॉक्टर उपचारासाठी पुढे आले. त्यामुळे पूर्वेची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू होऊन दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्या चिंता वाढवणारी 

मात्र याच टप्प्यात बोटावर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असलेल्या पश्‍चिमेकडील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत या भागांत दुसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढून हजारच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या भागात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पावणेसातशेवर पोचली आहे. पश्‍चिमेकडील वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. 


आज मोफत आरोग्य तपासणी
संगमेश्‍वर-कॅम्प कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. संगमेश्‍वर भागातील बहुसंख्य नागरिकांचा भाजीपाला मार्केटशी संबंध आहे. यातच जुने गाव असल्याने दाट लोकवस्ती आहे. त्याचप्रमाणे कॅम्प भागातील सिंधी कॉलनीतील असंख्य व्यावसायिक शहरात व्यवसायानिमित्त जातात. यातून या दोन भागांत प्रामुख्याने रुग्णसंख्या वाढली. प्रशासनाने त्याची दखल घेत कॅम्प-संगमेश्‍वर भागात आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिरात चारशेहून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली. रविवारी याच भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एम. डी. मेडिसिन तज्ज्ञांकडे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवले आहे. 


नियमांचे पालन करूनही अपयश
दोन आठवड्यांपासून शहरात रोज किमान ५० रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येतो. यात चार ते पाच रुग्ण पू्वेकडील व उर्वरित सर्व रुग्ण पश्‍चिम भागातील आहेत. पूर्वेकडील नागरिकांचा वावर बिनधास्त झाला आहे. त्यांची कोरोनाची भीती गेली आहे. याउलट सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करूनही बाजार, गर्दी, चौक, खरेदी यानिमित्ताने पश्‍चिम भागासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत आहे. 


चारशेपेक्षा अधिक रुग्ण ‘होम आयसोलेशन’
पश्‍चिम भागातील रुग्णसंख्येने सातशेचा टप्पा ओलांडला आहे. चारशेपेक्षा अधिक रुग्ण ‘होम आयसोलेशन’ आहेत. या भागातील २५ हून अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या पावणेदोनशे झाली आहे. महापालिकेचा सहारा व मसगा या दोन कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी शंभर, दोनशेहून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. मसगा कोविड सेंटर फुल झाले आहे. सहारामध्ये दोनशे खाटांची सोय असली तरी तेथील सोयी-सुविधांबाबत रुग्णांच्या असंख्य तक्रारी आहेत. 


कठोर उपाययोजनांची गरज
कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहराचा लौकिक जाणून जिल्हाबाहेरील रुग्ण येथे उपचारासाठी व काढा घेण्यासाठी येत होते. त्याच शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. नाशिकप्रमाणे मिशन झीरो अंतर्गत मोहीम राबविणे, घरोघरी रुग्ण तपासणी, होम आयसोलेशन असलेल्यांवर नियमांची सक्ती, संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी यांसह कठोर उपाययोजन न केल्यास परिस्थिती आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. 
 

संपर्क साधण्याचे आवाहन 
महापालिकेकडे साधनसामग्री, औषधांची कमतरता नाही. मात्र वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, सहाय्यक, स्वच्छता कर्मचारी आदींची कमतरता वारंवार जाणवत आहे. वैद्यकीय, आरोग्य विभागासाठी जाहिरात प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळत नाही. पूर्व भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात स्थानिक बीयूएमएस डॉक्टरांचा महत्त्वाचा सहभाग होता. पश्‍चिम भागातही प्रसंगी या डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. आयुक्त व संबंधितांनी बीयूएमएस डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यातून रुग्ण तपासणी व रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासही मदत होईल. 
 

संपादन : भीमराव चव्हाण

loading image
go to top