
Market Committee Election : मालेगाव बाजार समितीची आजपासून रणधुमाळी!
मालेगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार (ता. २७)पासून सुरू होणार आहे. समितीच्या १८ जागांसाठी चुरशीची निवडणूक अपेक्षित आहे. दोन किंवा तीन पॅनलमध्ये निवडणूक होऊ शकेल.
पालकमंत्री दादा भुसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांचे पॅनल समोरासमोर उभे ठाकणार आहे. दोन्ही नेत्यांनी पॅनलनिर्मितीची तयारी सुरू केली आहे. (Malegaon Market Committees election starts from today nashik news)
२७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. वैध नामनिर्देशनपत्रांची यादी ६ एप्रिलला प्रसिद्ध होईल. ६ ते २० एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २१ एप्रिलला प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी निशाणींचे वाटप केले जाणार आहे. २८ एप्रिलला मतदान होईल. मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत मतमोजणी होईल.
ग्रामपंचायत गटात एकूण चार जागा आहेत. यातील दोन सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित असणार आहे. ग्रामपंचायत गटात एक हजार २३२ मतदार आहेत. सोसायटी गटातून सर्वाधिक ११ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
यात सात सर्वसाधारण, दोन महिला राखीव, एक इतर मागासवर्गीय व एक जागा भटक्या जाती विमुक्त जमातीसाठी असेल. सोसायटी गटात एक हजार ५६८ मतदार आहेत. व्यापारी गटात दोन जागा असून, एकूण एक हजार १२५ मतदार आहेत. हमाल मापारी गटात एक जागा आहे.
या गटात सर्वांत कमी २६२ मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र शेळके, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.