टॅंकरच्या धडकेत महिलेचा
मृत्यू; दोन जण जखमी
मालेगाव, ता. १९ : येथील एकात्मता चौकात दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना डिझेलच्या टँकरने (एमएच ४१ एयु ९१२७) जबर धडक दिली. अपघातात पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा मुलगा व नातू गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रुकसाना सलीम शेख (वय ४९), मुलगा हंजला सलीम शेख, हंजलाचा मुलगा हसन हंजला शेख (तिघे रा. येवला) हे तिघे जण दुचाकीने (एमएच १५ जेक्यु ०१८३) दाताच्या दवाखान्यात दाखविण्यासाठी मालेगावला येत होते. भरधाव येणाऱ्या डिझेलच्या टँकरचालक इकबालराज मोहम्मद पठाण (रा. आयशानगर) तिघांना जोराची धडक दिली. त्यांच्या दुचाकीला फरफटत १०० मीटरपर्यंत नेले. अपघातात रुकसाना यांच्या डोक्यावरुन टँकरचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यांचा मुलगा व नातू गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरीकांनी हसन व हंजला या दोघांना उचलून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दोघा पितापुत्रांना गंभीर मार लागला आहे. टँकर हा मनमाडहून डिझेल भरुन अजंग येथील पेट्रोलपंपावर जात होता. कॅम्प पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु हाेते. पोलिस निरीक्षक योगेश पाटील तपास करीत आहेत.
-----
चौकट
शहरातील मुख्य चौकात घटना घडल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. शहरात सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. रुकसाना शेख या दाताच्या कामासाठी मालेगाव येथे येत असतांना काळाने झडप घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याने येवला येथे पटेल मशिदजवळ शोककळा पसरली आहे.