
गुरुजींनी हडप केली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती; कुंपनाने शेत खाण्याचा प्रकार
मालेगाव (जि. नाशिक) : सोनज (ता. मालेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका विमल सूर्यवंशी व प्राथमिक शिक्षक वामन सूर्यवंशी यांनी संगनमताने शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती हडप केली. गुरुजींनी अनुसूचित जमातीच्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सुमारे ९१ हजार रुपये सुवर्णमहोत्सव शिष्यवृत्तीचा अपहार केला.
वर्षभरापुर्वी घडलेल्या या प्रकारासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंपनानेच शेत खाण्याचा हा प्रकार जागृत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी उघडकीस आणला होता. (malegaon ZP Primary School headmistress teacher stolen ST students scholarships Nashik fraud crime Latest Marathi News)
पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी तानाजी घोंगडे (वय ५३, रा. बालाजीनगर, सटाणा) यांनी या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात श्रीमती सूर्यवंशी व श्री. सूर्यवंशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द ठकबाजी व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षकाने संगनमताने १६ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान शाळेतील सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवून संगनमताने परस्पर काढून ९१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. श्री. घोंगडे यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर चौकशी करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक स्वप्नील कोळी तपास करीत आहेत.
ग्रामस्थांनी आणला अपहार उघडकीस
सोनज हे राजकीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जागृत गाव आहे. येथील अनेक जण अधिकारी असून शिक्षक व सैन्य दलातील जवानांची संख्याही मोठी आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच राजेंद्र आहिरे व सहकारी यांच्या शाळा तपासणी दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला.
त्यांनी मुख्याध्यापिकेला जाब विचारला असता श्रीमती सूर्यवंशी यांनी प्राथमिक शिक्षक वामन सूर्यवंशी यांचे नाव पुढे केले. व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी दोघांची झाडाझडती घेतली असता शिष्यवृत्तीच्या रक्कमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर ग्रामस्थांनी याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर शिक्षण विभागाने चौकशी करुन हा गुन्हा दाखल केला. ग्रामस्थ जागृत असल्यास काय होवू शकते त्याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे.