अंबासन येथील सूनबाईंच्या हाती शिर्डी संस्थानचा कारभार! भूषविली अनेक महत्त्वाची पदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagyashree dhiware

अंबासन येथील सूनबाईंच्या हाती शिर्डी संस्थानचा कारभार!

वडेल (जि.नाशिक) : भारतीय प्रशासन सेवेतील २०१२ च्या तुकडीतील एकमेव महाराष्ट्रीय महिला अधिकारी यांनी यापूर्वी शासनाच्या विविध पदांची जबाबदारी लीलया पेलली आहे. शिर्डी येथील श्रीसाईबाबा मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच त्यांची नियुक्ती राज्य शासनाने केल्याने केवळ कसमादे परिसराचीच नाही, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचीच मान अभिमानाने उंचावली आहे. 'त्या' बागलाण तालुक्यातील अंबासनच्या सूनबाई आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

शिर्डी येथील श्रीसाईबाबा मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच भाग्यश्री बानाईत (धिवरे) यांची नियुक्ती झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड व मोर्शी येथे अनुक्रमे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या भाग्यश्री यांची २०१२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत निवड झाली. त्यांचे पती व नागपूर येथे प्राप्तिकर विभागात सहआयुक्त असलेले २०११ च्या भारतीय महसूल सेवेच्या तुकडीतील अधिकारी संजय धिवरे मूळचे अंबासन (ता. बागलाण) येथील असून, आजही त्यांचे वडील, निवृत्त उपप्राचार्य केशवराव धिवरे व आई निवृत्त शिक्षिका कस्तुराबाई सटाणा शहरात वास्तव्यास आहेत. संजय यांच्याशी विवाह झाल्यानंतर भाग्यश्री अंबासनच्या सूनबाई झाल्या असून, आजवर या कर्तबगार सूनबाईंनी भारतीय प्रशासन सेवेत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. कारण भाग्यश्री बानाईत (धिवरे) बागलाण तालुक्यातील अंबासनच्या सूनबाई आहेत.

हेही वाचा: OBC चळवळीचा ‘आर्म' होणार ‘स्ट्राँग! राष्ट्रवादीला मिळेल बळ

आता त्यांची भारतातल्या दुसऱ्‍या क्रमांकाच्या श्रीमंत देवस्थानच्या अर्थात, श्रीसाईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झालेली नियुक्ती ही समस्त कसमादे परिसराचा अभिमानाचा विषय ठरला आहे. भारतीय प्रशासन सेवेतील २०१२ च्या तुकडीतील एकमेव महाराष्ट्रीय महिला अधिकारी असलेल्या भाग्यश्री यांनी यापूर्वी शासनाच्या विविध पदांची जबाबदारी लीलया पेलली आहे. त्यांना प्रशासन सेवेतील उल्लेखनीय कामांसाठी अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा: चिकूच्या शेतीने आर्थिक पाठबळ! हरणगावच्या शेतकऱ्याचा प्रयोग

भाग्यश्री बानायत (धिवरे) यांनी भारतीय प्रशासन सेवेत भूषविलेली पदे-

*संचालक, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर

*सहायक आयुक्त, कोहिमा

*उपविभागीय अधिकारी, फेक, नागालॅंड

*अतिरिक्त जिल्हा आयुक्त, चिपोबोझो, नागालॅंड

*उपसचिव, गृह विभाग, सचिवालय, नागालँड

*व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर

*सहाय्यक आयुक्त (विक्रीकर विभाग)

*तहसीलदार व प्रकल्प अधिकारी

भाग्यश्रीचे माहेर अमरावती असून, सासर अंबासन आहे. आजवर अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्‍या भाग्यश्रीकडे आता श्रीसाईबाबा संस्थान, शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आली असून, ही जबाबदारीही ती उत्साहाने पार पाडेल, असा विश्‍वास आहे. - संजय धिवरे, सहआयुक्त, प्राप्तिकर विभाग, नागपूर तथा भाग्यश्री यांचे पती

भाग्यश्री धिवरे अंबासनच्या सूनबाई असून, त्या व त्यांचे पती संजय धिवरे हे आम्हा तरुणांसाठी आदर्श अधिकारी असलेले दांपत्य आहे. भाग्यश्री वहिनींची श्रीसाईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झालेली नियुक्ती हा धिवरे कुटुंबासह अंबासन व कसमादे परिसरासाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे. - विशाल धिवरे, प्राथमिक शिक्षक व भाग्यश्री यांचे दीर