
चिकूच्या शेतीने आर्थिक पाठबळ! हरणगावच्या शेतकऱ्याचा प्रयोग
पेठ (जि.नाशिक) : पारंपरिक भात, नागलीची शेती कसत दरवर्षी जास्त खर्च, कमी उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या माथ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत जातो. ही दैना घालविण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी फळबागेच्या शेतीकडे वळावे. मला वीस चिकूच्या झाडांनी मोठा आर्थिक धार दिल्याने माझे कुटूंब कर्जापासून मुक्त झाले आहे. कमी खर्चात कमी कष्टात जास्त उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन हरणगाव (जोगमोडी) येथील चिक्कू शेतीचे प्रयोगशील शेतकरी गणेश जाधव यांनी केले आहे.
चिकूच्या शेतीने दिले आर्थिक पाठबळ
पावसाच्या लंपडावामुळे भात नागलीची शेती फसवी झाली आहे. रोप तयार करण्यापासून ते काढणीपर्यत एकरी २५ ते ३० हजाराचा खर्च होतो. अनेक वर्षापासून पाऊस मनमौजी झाल्याने भात नागलीची पिके हुकमी राहिलेली नाहीत. आदिवासी भागात वातावरण बदलामुळे फळबाग शेतीला पूरक स्थिती निर्माण झाली आहे. हरणगाव येथील प्रयोगशील सुशिक्षित तरुण गणेश जाधव याने आपल्या शेतातील बखळ जागेत सात वर्षापूर्वी चिकूच्या कालिपती या वाणांच्या विस झाडांची लागवड करून सेंद्रीय खतांची मात्रा दिली.
सेंद्रीय खतांना प्राधान्य
‘आरोग्यासाठी धरू ध्यास सेंद्रीय शेतीचा, टिकवून ठेऊ पोत आपल्या मातीचा‘ या न्यायाने आपल्या घरच्या जनावरांचे शेणखत चिक्कूला वापरून शेतीचा पोत वाढविला. आठ महिन्यात मला वीस झाडापासून आठ क्विंटल चिकूचे उत्पन्न मिळाले. दर आठ दिवसाच्या अंतराने दोन- तीन कॅरेट फळे तोडून कुठल्याही केमिकलचा वापर न करता घरीच पिकविली. चिक्कूत गोडी असून फळाची प्रत चांगली असल्याने कोणत्याही बाजारपेठेत विक्रीस न नेता जागेवरच एका किलोस ४० ते ४५ रुपये भावाने विक्री केली. यामुळे मला मोठा आर्थिक आधार मिळाला.
आणखी प्रजाती लावणार
चिकूच्या झाडाला उष्ण व कोरडे दमट हवामान पोषक असून रोगराईला बळी पडत नाही. पुढील काळात चिकूच्या कालिपत्ती, घोलवड, पिलिपती, क्रिकेट बॉल या जातीची लागवड करणार आहे असे सांगत आदिवासी तरुणाने प्रयोगशील बनून फळ शेतीकडे वळावे असे आवाहनही जाधव करतात.
पारंपरिक शेतीने कधी पोट भरू दिले नाही, कर्जाच्या विवंचनेत आईबापाला सुखाची नव्हती. चिक्कूने बापाचे डोक्यावरील कर्ज उतरविले. भाताने रडवले, चिक्कूने हसवले म्हणत आज त्यांच्या चेहऱ्यावर व घरात आनंद फुलविला. तरुणांनी उपजिविकेसाठी स्थलांतर न करता आपल्या मातीत राबून फळ शेतीतून भरघोस उत्पन्न घ्यावे आणि आपल्या कुंटूंबाला गरिबीच्या खाईतून वर काढावे . - गणेश जाधव, प्रयोगशील शेतकरी, हरणगाव.