Nashik : आठवडे बाजारात आंब्याचेच राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mangoes

Nashik : आठवडे बाजारात आंब्याचेच राज्य

येसगाव (जि. नाशिक) : मे महिना आंब्यांचा हंगाम (Mangoes Season) असतो. लहान थोर सर्वत्र आंब्याची चव चाखतात. अक्षय तृतीयेला (Akshay tritiya) आमरसाचा नैवद्य दाखविला जातो. तेव्हापासून आंबा बाजारात दाखल होतो. टप्प्याटप्प्याने आंब्याच्या विविध जाती हजेरी लावतात. हापूस केसरी ,बदामी व नवीन विकसित झालेल्या जातीचे आंबे बाजारात आले आहेत. (Mangoes in demand in weekly market Nashik News)

गावात गहु, हरभऱ्याची डाळ व आंबे घरचेच असल्यामुळे पुरणपोळी (Puran Poli) व आमरसाच्या मेजवान्या सुरु झाल्या आहेत. दोन वर्षापासून कोरोनामुळे भाऊबंद व मित्रमंडळींना आमंत्रित करता आले नव्हते. यंदा मात्र आमरसाच्या मेजवान्या सुरू झालेल्या आहेत. विषेश म्हणजे नवीन व्याही, मुलीला व जावई बापूंना जेवणासाठी खास आग्रहाचे आमंत्रण दिले जात आहे. बाजारात आंबा आल्यानंतर इतर फळांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. टरबूज, खरबूज, द्राक्षे, सफरचंद, केळी, करवंद, शहाळे, मोसंबी आदींच्या किमतीवर परिणाम झाला आहे. रोजचा आंब्याचा खप निश्‍चित जास्त आहे. त्यामुळे वरील फळांना व्यापाऱ्यांकडून मागणी नाही.

आंब्याचे राज्य बाजारात आहे तोपर्यंत इतर फळांची आपोआप पिछाडी होते. आंब्याची आवक वाढल्यामुळे एरवी भाजीपाला विकणारे आंबे विक्रीसाठी दिसत आहेत. या गाड्या गल्ली- बोळातून फिरत आहे. अक्षयतृतीयेला असणारा आंब्याचा भाव नंतर कमी होत जातो. पावसाळा जसजसा जवळ येईल तसा आंब्यांच्या किमतीही उतरतात. मागणी वाढली तर भाव वाढू शकतो. विशिष्ट मधुर चवीमुळे आंबा फळांचा राजा मानला जातो. हापूस आंबा गरिबांना न परवडणारा आहे. आंब्याचे दरही प्रतीनुसार असल्याने दर टिकून राहत नाही. तज्ज्ञांच्या मते आंब्यात अ, ब, क जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, स्फुरद, खनिज द्रव्ये, शर्करा व प्रथिने असतात. आंबा शरीर वर्धक मानला जातो. गुणकारी गावठी आंब्याचा स्वाद गावागावातून घेतला जात आहे. एकंदरीत बाजारात आंब्यांना मागणी दिसून येत आहे. जास्त दिवस टिकणारा व अप्रतिम हापूस आंबा सातासमुद्रापार सफर करीत आहे.