Damage Road : मनमाड- गिरणारे रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जडले आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Potholes on Umrane Road.

Damage Road : मनमाड- गिरणारे रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जडले आजार

चांदवड (जि. नाशिक) : मनमाड- उमराणे राज्य मार्गाची मनमाड ते गिरणारेदरम्यान अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. हा रस्ता कधी दर्जेदार होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार डॉ राहुल आहेर यांनी दखल घेऊन लवकर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी चांदवड तालुक्यातील वाहनधारकांनी केली आहे. (Manmad umrane damaged road road cause disease to public nashik news)

राज्य मार्ग असून वाहतूक जास्त असूनही फक्त नावालाच डांबरीकरण आहे. चांदवड व देवळा तालुक्यातून जाणारा मनमाड-उमराणे रस्त्यावर जागोजागी प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दुचाकी व अन्य वाहने स्त्यावरून चालवणे मुश्किल झाले आहे. खड्ड्यांवरून गाडी चालवायची कशी, असा प्रश्न होत निर्माण होत आहे. मनमाड-लखमापूर-ताहराबाद-नामपूर- साक्री असा हा रस्ता आहे.

या रस्त्यावरून सप्तशुंगी गडाकडे जाणारे भाविकही मोठ्या संख्येने जात असतात. उमराणे येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून, येथील कांदा मनमाड रेल्वेस्थानकावर नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. विशेषत: दुचाकीस्वार खड्डे टाळताना कधी दुसरी गाडी अंगावर येईल, याचा भरोसा नसतो. अनोळखी माणसे गाडी चालवीत असताना, अचानक खड्ड्यात जाऊन आदळतात. त्यामुळे शारीरिक दुखापत होण्याचा मोठा धोका आहे.

हेही वाचा: Dry Fruits Rate Hike : महागाईमुळे मेथीचे लाडू कडवडले!

दरेगावाजवळ फरशीपूल अत्यंत लहान असून, नदीपात्रात पुराचे पाणी येते तेव्हा हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतो. त्यामुळे उंच पूल बांधावा, अशी मागणीही नागरिकांची आहे. मनमाड- उमराणे रस्ता पूर्णपणे नव्याने तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.

"ठमनमाड- उमराणे रस्त्याचे मनमाड- गिरणारेदरम्यान येत्या दोन ते तीन दिवसांत काम सुरू करून हे काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल."

-चैतन्य महाले, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चांदवड

हेही वाचा: Spiritual Wear Fashion Show : नाशिकमध्ये आध्यात्मिक वेशभूषेचा फॅशन शो