मनमाडची आकांक्षा ठरली रौप्यपदकाची मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वजन उचलताना आकांक्षा व्यवहारे

मनमाडची आकांक्षा ठरली रौप्यपदकाची मानकरी

मनमाड (नाशिक) : वेटलिफ्टिंग खेळात आज मनमाडचे नाव जागतिक पातळीवर चमकले. मनमाडची खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने मेक्सिकोत सुरू असलेल्या जागतिक यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. आकांक्षाचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी जागतिक खेळाडू घडविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे.

आकांक्षा अवघ्या १५ वर्षांची... सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाची साथ यामुळे जागतिक पातळीवर पोचली असली, तरी या खडतर प्रवासात तिला सक्षम करणारे तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचा मोलाचा वाटा आहे. गुरू गोविंदसिंग हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या आकांक्षाने जय भवानी व्यायामशाळेत प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे गिरविले. आठवीत असल्यापासून तिने वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला. पुरुषी खेळ असतानाही आकांक्षाने मुलीदेखील कमी नाहीत, हे दाखवत सक्षमपणे भार उचलत राहिली.

हेही वाचा: आंतरराज्य ॲथलेटिक्स : संजीवनी जाधवला सुवर्ण, रौप्यही महाराष्ट्राच्या प्राजक्ताला

दोन महिन्यांपासून भारतीय क्रीडा प्राधिकरण पंजाबच्या पतियाळा येथे तिचा सराव सुरू होता. भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरातसुद्धा आकांक्षाने जिद्द व मेहनतीच्या जोरावर उत्तम कामगिरी बजावली होती. मेक्सिकोच्या लिओन येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ४० किलो वजनगटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लीन जर्क असे १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. मनमाडच्या क्रीडा इतिहासात जागतिक यूथ वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे.

प्रशिक्षकांना आनंद

१९९७ पासून प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे मनमाड शहरात वेटलिफ्टिंग खेळात खेळाडू घडवत आहेत. आजपर्यंत चारशे ते पाचशे खेळाडू त्यांनी घडविले. यात ५० राष्ट्रीय सुवर्णपदकविजेते, तर सव्वाशेच्या पुढे राज्य सुवर्णपदकविजेते खेळाडू आहेत. जागतिक स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये आपले खेळाडू खेळावेत ही त्यांची पूर्वीपासूनची इच्छा आहे. आज त्यांची पुतणी आकांक्षा हिने भारतासाठी जागतिक रौप्यपदक मिळविले. तिच्या आई-वडिलांपेक्षा व्यवहारे सर यांना जास्त आनंद झाला. मोठ्या शहरांचा मोठा गवगवा असला तरी ग्रामीण भागातही त्याच प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रशिक्षक आहे याचे उत्तम उदाहरण प्रवीण व्यवहारे यांच्यामुळे पुढे आले आहे.

हेही वाचा: 'खेलो इंडिया'वर महाराष्ट्राची छाप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप!

Web Title: Manmads Player Made A Historic Performance At The World Youth Weightlifting Championships In Mexico Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksportsSilvermedals
go to top