नाशिक: मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. नाशिकमधून सकाळच्या सत्रात १०० हून अधिक वाहनांचा ताफा वाजत-गाजत रवाना झाला. बस, रेल्वे, लोकल ट्रेनमधून हजारो कार्यकर्ते रवाना झाले. जिल्ह्यातून दिंडोरी, निफाड, सिन्नर, मालेगाव परिसरातूनही अनेक जण वाहनांनी रवाना झाले आहेत.