राज्यस्तरीय मराठा वधू-वर
मेळाव्याच्या नोंदणीला सुरुवात
‘रेशीमगाठी’ पुस्तिकेसाठी विवाहेच्छुकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२३ : मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘रेशीमगाठी मराठा अनुरूप’ या वधू-वर परिचय पुस्तिकेच्या नोंदणी अर्ज वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच मेळाव्याच्या पोस्टरचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
धुळे येथील हिरे भवन, स्टेशन रोड येथे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. यंदाच्या पुस्तिकेसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण खानदेशातील विवाहेच्छुक वधू-वरांची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विविध जिल्हे व तालुक्यांतील प्रतिनिधींच्या माध्यमातूनही नोंदणी फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. इच्छुकांनी आपले परिचयपत्र, छायाचित्र आणि आवश्यक माहिती अचूकपणे भरून सेवा संघाच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
पोस्टर प्रकाशन सोहळ्याप्रसंगी खानदेश समन्वयक प्रा. सुनील गरुड, ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे, जिल्हा संघटक एस. वाय. पाटील, वधू-वर कक्षाचे प्रदेशाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रा. व्ही. सी. पाटील, सुदाम पाटील आदी उपस्थित होते.
वधू-वर कक्षाचे राज्याध्यक्ष पी. एन. पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुनील पवार, कार्याध्यक्ष विजयकुमार ढोबळे, डी. एल. पाटील आणि मधुकर पाटील यांनी या उपक्रमात सहभागी होऊन विवाहेच्छुक वधू-वरांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले.