esakal | लग्नाच्या बोहल्यावर 'पॉझिटिव्ह' पाऊल! 50 'एचआयव्ही'बाधितांनी बांधल्या रेशीमगाठी
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

50 HIV पॉझिटिव्ह बाधितांनी बांधल्या लग्नाच्या रेशीमगाठी!

sakal_logo
By
एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : एड्‌सचे निदान झाल्यानंतर खरेतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कुणाला एड्सग्रस्त पतीमुळे लागण झाली, तर कुणाला वैद्यकीय उपचारातील हलगर्जी भोवली. पतीच्या निधनानंतर एचआयव्हीग्रस्त विधवांचे आयुष्य एकाकी बनले होते. तरुण मुला-मुलींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेक आई-वडील हतबल झाले होते. अशा एड्‌सग्रस्तांना आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात काही संस्था पुढे येत आहेत. एचआयव्ही म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे तर नवी सुरवात असू शकते, हे दाखवून दिले. या संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात लग्नाच्या बोहल्यावर पडत असलेल्या पॉझिटिव्ह पावलांनी एड्‌सबाधितांच्या जीवनात आयुष्याची नवी पहाट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पन्नासहून अधिक एड्‌सग्रस्तांचे विवाह जमले असून, या दुर्धर आजाराशी सामना करत त्यांचे आयुष्य फुलले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर उमललेली फुले म्हणजे अपत्ये एड्‌समुक्त जन्माला आली आहेत. (Marriage-of-50-HIV-positive-people-in-five-years-marathi-news-jpd93)

एकटेपणावर लग्न हाच पर्याय

सिन्नर येथील शेतकरी असलेला तरुण एचआयव्हीबाधित असल्याने कुटुबांतील अनेकांनी त्यांची हेटाळणी केली, पण आपल्या हिश्शाची आलेली जमीन विवाह करून आपल्या मुलांना मिळावी, दूषणे देणाऱ्या भाऊबंदांना नाही, असा चंग त्याने बांधला. नाशिकच्या संस्थेच्या माध्यमातून बाधित मुलीशी लग्न केले. त्यांना मुलगा होऊन तो एचआयव्हीमुक्त असून, दोघेही गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. अपघातानंतर उपचारातून बरे झाल्यावर ३१ वर्षांच्या तरुणाने लग्न केले. ७० वर्षांच्या वडिलांनी आपल्या ४० वर्षांच्या मुलाचा विवाह लावून दिला. २६ वर्षांच्या विधवा तरुणीने एकटेपणावर लग्न हाच पर्याय निवडला. यातील प्रत्येक जण एचआयव्हीग्रस्त आहे.

वधू-वर मेळाव्यातून विवाह जुळविले

नेटवर्क विथ नाशिक लिव्हिंग विथ एचआयव्ही व समर्पण फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्तांच्या आयुष्यात आनंद पेरणारे उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत एड्‌सग्रस्तांना वैवाहिक जीवन जगता यावे व त्यांना जोडीदार मिळावा, यासाठी रेशीमगाठ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून ही चळवळ सुरू असून, एड्‌ससह जगणारे रुग्ण लग्नासाठी होकार देत आहेत. विशेष म्हणजे वधू-वर मेळाव्यातून काही विवाह जुळविले आहेत. एड्‌सग्रस्तांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी विवाह हा सकारात्मक उपाय ठरू शकतो, या दृष्टीने संस्था काम करीत आहे.

...म्हणून घेतला जातोय लग्नाचा निर्णय

एड्‌सची लागण झालेल्या स्त्रियांपेक्षा पुरुषांना जोडीदाराची गरज अधिक वाटत असल्याचे सेवाभावी संस्थांच्या निदर्शनास आले आहे. पुरुष एड्‌सग्रस्तांची संख्या जास्त असते. मात्र, पतीकडून लागण झाल्यानंतर तिशीच्या उंबरठ्यावरील एचआयव्हीग्रस्त विधवांनाही जोडीदार असावा, असे वाटत आहे. त्यात कुटुंबाकडून मिळणारी दुय्यम वागणूक आणि दुर्लक्ष, तसेच समाजाचा चुकीचा दृष्टिकोन यामुळे असे स्त्री-पुरुष लग्नाचा निर्णय घेत आहेत.

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

‘समर्पण’चा पुढाकार...

चार महिन्यांपूर्वी समर्पण फाउंडेशनने दोघा एचआयव्हीग्रस्तांच्या हृदयाची भेट घडवून देत साताजन्माच्या गाठी बांधल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने हा विवाह झाला. दोडी (ता. सिन्नर) ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक विलास बोडके, जानकी काळे यांनी ही रेशीमगाठ बांधली.

जिल्ह्यात १५ हजार बाधित

नाशिक जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या सुमारे १५ हजार एवढी आहे. यातील बहुतांश जण अविवाहित आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवली तर त्यांचे आयुष्य सुरळीत होते. विशेष म्हणजे कोविड प्रतिबंधक लस घेण्याला त्यांना कोणताही अडथळा नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एड्‌सग्रस्त व एचआयव्हीसह जगणाऱ्यांच्या आजाराचे गांभीर्य पाहून त्यांना जोडीदार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अजूनही काही एड्‌सग्रस्तांना त्यांचे कुटुंबीय व समाज सामावून घेत नाही, हे वास्तव आहे. पण, त्यांनाही वैवाहिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. कुटुंब व बाधितांचे तसे समुपदेशन आम्ही करतो. -महेंद्र मुळे, अध्यक्ष, नेटवर्क ऑफ नाशिक लिव्हिंग विथ एचआयव्ही संस्था

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image