लग्नाचे आमिष दाखवून
गुजरातच्या तरुणाला गंडा
वणी, ता. १४ : लग्नाचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने दोन लाख रूपये पैसे घेत व न्यायालयीन विवाह न करता नोटरी करार करत विवाह झाल्यानंतर परतीच्या प्रवासात तरूणाची गाडी अडवून मारहाण करीत मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुरत येथील जगदीशकुमार गेहलोत यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत येथील जगदीशकुमार गेहलोत हे खासगी नोकरी करतात. संशयित धोंडू नंदा साळवे (रा. मखमलाबाद, नाशिक) याच्याशी त्यांची दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीतून साळवे याने जगदीशकुमार याला लग्नासाठी मुलगी दाखविली. मुलगी पसंत पडल्यानंतर कमल (रा. नाशिक) व साळवे यांनी मध्यस्थी करून लग्न ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी संशयित यांनी जगदीशकुमार यांच्याकडून मुलगी पाहण्यासाठी आल्यानंतर गाडी भाड्याच्या नावाखाली पाच हजार रुपये, नाते ठरविण्यासाठी २० हजार रुपये आणि लग्नाच्या तयारीसाठी साडेसात हजार रुपये घेतले. पुढे जगदीशकुमार हे नाशिक येथे लग्नासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रोख व ऑनलाइन माध्यमातून पैसे दिल्यानंतर बोलीप्रमाणे प्रत्यक्ष न्यायालयीन विवाह न करता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्नासंबधी नोटरी करार करून त्यांचा विश्वास संशयित यांनी संपादीत केला. १२ ऑक्टोबरला रात्री आठला जगदीशकुमार हे परतीच्या प्रवासात पिॆंपळगाव - वणी रस्त्यावरील खेडगाव शिवारात सीएनजी पंपापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पोहोचताच त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी कारमधून आलेल्या काही तरुणांनी त्यांना मारहाण करून मुलीसह मंगळसूत्र, पर्स व रोकड घेऊन पसार झाले. या प्रकरणी धोंडू नंदा साळवे, कमलाताई, निकिता सखाराम गोळे (रा. भिवगाव बुद्रुक, सावखेड भोई, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.