
Nashik : कलाकारांच्या कलाकृतींना मुंबईत रसिकांचा भरघोस प्रतिसाद !
पंचवटी (जि. नाशिक) : नाशिकच्या चार चित्र- शिल्प कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहाँगीर कलादालनात (Jehangir Art Gallery) झाले. अपेक्षित चित्र विक्री होत नाही या नेहमीच होणाऱ्या चर्चेला या कलाकारांनी कृतीतून चोख उत्तर दिले. सुमारे पाच लाख रुपयांची विक्री तर झालीच पण नाशिकचे नावही या कलाकारांनी कला जगतात रोशन केले. (Massive response of fans in jehangir gallery Mumbai to works of artists from nashik Nashik News)
नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध जहाँगीर कलादालनात नाशिकच्या चार चित्रकारांचे ‘आर्ट लाईन’ हे समूह चित्रप्रदर्शन (Painting Exhibition) झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार अनिल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. ख्यातनाम चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आर्ट लाईन हे समूह चित्रप्रदर्शन नाशिकच्या चार प्रसिद्ध चित्रकारांनी भरवले होते. मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर शाळेचे कला शिक्षक अतुल भालेराव तसेच एस. एम. आर. के. कला महाविद्यालयाच्या प्रा. भारती हिंगणे, नवरचना शाळेचे कला शिक्षक संतोष मासाळ, इंडियन सिक्युरिटी प्रेसचे डिझाईन विभागातील व्यवस्थापक शिल्पकार सुजित मुखोपाध्याय यांचा सहभाग होता.
चित्रप्रदर्शनात भालेराव यांची ऍक्रेलिक (Acrylic) माध्यमातील क्रिएटिव्ह लॅन्डस्केप (Creative landscape) प्रदर्शित केलेली होती. निसर्ग जसा दिसतो तसा चित्रित करण्याऐवजी जसा भासतो तसा चित्रित करण्याचा प्रयत्न चित्राद्वारे भालेराव यांनी केला. भारती हिंगणे यांनी पिक्टोरीकल कंपोझिशन (Pictorial Composition) या माध्यमात भारतीय पौराणिक विषय आकारांचे सुलभीकरण करून सांकेतिक पद्धतीने मांडले. संतोष मासाळ यांनी अमूर्त चित्रशैलीमध्ये केलेली चित्रे व त्यासाठी वापरलेली पोत निर्मिती, रंगसंगती आकर्षक ठरली. रंगांचा तोल योग्य पद्धतीने साधलेला जाणवला. शिल्पकार सुजित मुखोपाध्याय यांनी मानवी जीवनातील विविध घडामोडी, भावभावना आपल्या शिल्पाद्वारे व्यक्त केल्या. त्यांची बुद्ध, वृक्ष, माता ही शिल्पे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
हेही वाचा: Nashik : बिटकोचे १५ दिवसात स्थलांतर
माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, राज्यमंत्री शेट्टी, जे. जे. कला महाविद्यालयाचे डीन प्रा. काशिनाथ साबळे, नामांकित चित्रकार दत्तात्रेय पाडेकर, प्रा. शेळके, राज्यातील विविध कला महाविद्यालयातील प्राध्यापक, चित्रकार, कलारसिक, कला शिक्षक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. कला रसिकांनी चांगली दाद चित्र खरेदीद्वारे दिली. सुमारे ५ लाखांची चित्र विक्री झाली.
हेही वाचा: Chalisagaon : जुगार अड्ड्यावर छापा; 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Web Title: Massive Response Of Fans In Jehangir Gallery Mumbai To Works Of Artists From Nashik Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..