मास्टर मॉल आग; सलग 28 तास उलटूनही आगीचा भडका कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Master Mall Fire

मास्टर मॉल आग; सलग 28 तास उलटूनही आगीचा भडका कायम

जुने नाशिक : गंजमाळ येथील मास्टर मॉलला रविवारी (ता. १९) सायंकाळी आग लागली. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतरही दुसऱ्या दिवशी आगीचा भडका कायम होता. त्यामुळे संपूर्ण जुने नाशिक धूरमय झाले होते. मॉलला लागून असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्येही भीती कायम होती. (Master mall fire continued for 28 hours nashik news)

मॉलच्यावरील मजल्यात असलेल्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. हा मॉल अडचणीच्या जागेत असून, त्यास आपत्कालीन दरवाजा, तसेच व्हेंटिलेशन नसल्याने आणि धुराचे लोट यामुळे आग विझविण्यात मोठी अडचण येत होती. सलग दुसऱ्या दिवशी आग दगदगीची शहरातील ही पहिलीच घटना आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आग विझविण्यात अडचण येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. सलग दुसऱ्या दिवशीही आग सुरू होती. त्यामुळे रविवारपेक्षा सोमवारी धुराचे लोट अधिक प्रमाणात बाहेर पडत होते. दुपारी आगीचा भडका वाढल्यानंतर त्यावर काहीअंशी नियंत्रण मिळवले. रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा जम्बो क्रेनचा वापर करत पाण्याचा मारा केला. सलग २८ तास उलटूनही आग सुरूच असल्याने मॉलचे मालक आणि अग्निशमन विभागाचाही काहीसा धीर सुटत असल्याचे बघावयास मिळाले. आग आटोक्यात येत नसल्याने शेवटी मॉलचा पुढील भाग जम्बो पॉकलेन यंत्राने तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरून रात्री उशिरा पॉकलेन घटनास्थळी दाखल होणार आहे. त्याच्या सहाय्याने पुढील भाग तोडल्यास सकाळपर्यंत आग आटोक्यात येण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच भद्रकाली पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

प्रथमच डीसीपी बॉलचा वापर

आगीची तीव्रता लक्षात घेता आग विझवण्यासाठी प्राथमिक स्तरात वापरण्यात येणाऱ्या डीसीपी बॉलचाही वापर करण्यात आला. घटना मोठी असल्याने तसेच २८ तासांपासून अग्निशमन विभागाचे आणि पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. घटना सोडून कार्यालयात जाणे शक्य नसल्याने घटनास्थळीच अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बदली करून रिलिफ देण्यात आली. इतर वेळेस पोलिस ठाण्यात तसेच कार्यालयात कर्मचारी बदली होत असतात.

महापालिका आयुक्तांची घटनास्थळास भेट

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी (ता. २०) रात्री नऊच्या सुमारास घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेण्यात आली. आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील पाहणी करत अग्निशमन कर्मचारी तसेच आयुक्तांशी चर्चा केली. दरम्यान, मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली.