मालेगाव : मोसम नदीला आले गटारीचे स्वरुप | nashik latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mausam  river

मोसम नदीला आले गटारीचे स्वरुप

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मोसम नदीला (Mausam River) गटारगंगेचे स्वरुप आले आहे. भूमिगत गटारीच्या कामामुळे नदीपात्रात मुरुम, माती टाकल्याने नदीचे पाणी वाहणे बंद झाले आहे. यामुळे जागोजागी सांडपाण्याची डबकी साचली आहेत. डास, दुर्गंधी, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नदी सर्वाधिक प्रदुषित झाली आहे. यामुळे विविध साथीचे आजार बळावले आहेत. सातत्याने पाठपुरावाकरुनही महापालिका प्रशासन नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक नागरी सुविधा समितीने मोसम स्वच्छतेसाठी मनपाला साडी चोळीची ओवाळणी भेट देत सजविलेल्या बैलगाडीतून डासाची प्रतिकृती तयार करीत मिरवणूक काढून अनोखे आंदोलन केले.

शहरात आज या आंदोलनाची जोरदार चर्चा होती. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमेश्‍वर मारुती चौकातून सजविलेल्या बैलगाडीतून डासाच्या भव्य प्रतिकृतीसह मिरवणूक काढली. महात्मा फुले रस्ता, रामसेतू पुल या मार्गाने मिरवणूक महापालिकेत पोहोचली.

आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक उपायुक्त अनिल पारखी, सचिन महाले, उपअभियंता सचिन माळवाळ आदींना निवेदन सादर करीत प्रत्येकी ९ वार या प्रमाणे तीन साड्या व ६ वार चोळीची ओवाळणी देत नदी स्वच्छतेसाठी साकडे घातले. निवेदनात शहरात विकास आखाड्याप्रमाणे कामकाज व्हावे, शहरातील सर्व पुलांवरील अनाधिकृत हॉकर्स झोन व पार्किंग झोन हटवावेत. घोषित २१ पार्किंग झोनची अंमलबजावजणी करावी. मोकाट कुत्री व जनावरांचा बंदोबस्त करावा. नियमित साफसफाई करावी. सांडव्या पुलाची उंची वाढवावी. महात्मा फुले भाजी मंडईत महिलांसाठी प्रसाधनगृह व सुलभ शौचालय बांधावेत. प्रमुख बाजारपेठेतील खड्डे बुजवून कॉंक्रीटीकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

नदीचा आर्त आवाज व शहरवासियांच्या भावना प्रशासनाला समजाव्यात यासाठी नदीला महापूर आल्यानंतर सुवासिनी महिला साडी, चोळी देवून नदीची आरती ओवाळतात व पुर ओसरावा म्हणून साकडे घालतात. त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाला साडी चोळीची ओवाळणी देऊन नदी स्वच्छतेसाठी साकडे घालत हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : ‘नदी वाचवा’ अभियानात साडेपाच टन कचरा संकलित

समिती वर्षानुवर्षे नदी प्रदुषण रोखण्यासाठी आंदोलन करीत आहे. आगामी काळात प्रशासनाने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री. बोरसे यांनी दिला. आंदोलनात जितेंद्र पाटील, कैलास शर्मा, भरत पाटील, निखील पवार, कैलास तिसगे, अजय जगताप, नेव्हीलकुमार तिवारी, भालचंद्र खैरनार, दीपक पाटील, निलेश पाटील, प्रसाद हांडे, किशोर गढरी, शुभम वाघ, बंटी शेलार, गोपाळ सोनवणे, सागर वाणी, अंबू जाधव, सलीम बांगडीवाले, फारुक कच्छी आदींचा समावेश होता.

हेही वाचा: नांदेड : वाळू घाटातील रस्त्यांसाठी नदीच्या दरडीचे खोदकाम

Web Title: Masum River Look Like Gutter Due To Water Flowing Stoped In Malegaon Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikpollutionRiver
go to top