Latest Marathi News | आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivaji Nalabhe

Nashik News : आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman

नाशिक : वस्‍तू व सेवा कर (जीएसटी) यासारख्या महत्‍वाच्‍या खात्‍यात काम करतांना कर्तव्‍य बजावतांना राज्‍यकर अधिकारी शिवाजी उत्तमराव नलभे यांनी क्रीडा क्षेत्रात उज्‍ज्‍वल यश मिळविले आहे. अत्‍यंत खडतर अशी आयर्नमॅन स्‍पर्धा पूर्ण करतांना त्‍यांनी आपल्‍यातील कर्तृत्‍व सिद्ध केले आहे.

कजाकिस्‍तान येथे झालेली स्‍पर्धा निर्धारित वेळेपेक्षा एक तास १८ मिनीटे आधीच पूर्ण करत आपल्‍या पहिल्‍या प्रयत्‍नात त्‍यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला असून, ही कामगिरी करणारे ते जीएसटी विभागातील राज्‍यातील पहिले अधिकारी ठरले आहेत. (maths obsessed officer became Ironman in his first attempt in kazakhstan nashik Latest Marathi News)

मुळचे पैठण (जि.औरंगाबाद) येथील असलेले शिवाजी उत्तमराव नलभे हे गेल्‍या बारा वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असतांना कर्तव्‍य बजावता आहेत. वस्‍तू व सेवा कर (जीएसटी) नाशिक कार्यालयात सध्या ते राज्‍यकर अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळता आहेत. कार्यालयीन जबाबदारी पार पाडतांना त्‍यांनी क्रीडा क्षेत्रातील आपल्‍या कर्तृत्‍वाचा ठसा उमटविला आहे.

नुकताच ऑगस्‍टमध्ये कजाकिस्‍तानची राजधानी अस्‍थाना येथे झालेल्‍या आयर्नमॅन स्‍पर्धेत त्‍यांनी सहभागी नोंदवितांना, निर्धारित वेळेपूर्वी ही स्‍पर्धा पूर्ण केली आहे. त्‍यांनी आपल्‍या पहिल्‍या प्रयत्‍नात आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे. या कामगिरीसाठी जीएसटी विभागाचे अप्पर राज्‍यकर आयुक्‍त सुभाष ऐंगडे, राज्‍यकर सहआयुक्‍त हरिश्‍चंद्र गांगुर्डे यांचे प्रोत्‍साहन व मार्गदर्शन लाभले.

अशी राहिली स्‍पर्धेतील कामगिरी..

या स्‍पर्धेत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर अंतर सायकल चालविणे आणि ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन धावण्याची शर्यत अशा तिन्‍ही क्रीडा प्रकारांतील कामगिरी साडे सोळा तासात पूर्ण करायची होती. श्री.नलभे यांनी उत्‍कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करतांना पंधरा तास १२ मिनीटांत स्‍पर्धा पूर्ण करत किताब पटकावला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Dhule News : 2 रस्त्यांसाठी 35 कोटी; शिरपूरला अमरिशभाईंमुळे मंत्री गडकरींकडून लाभ

लठ्ठपणा कमी करण्यासाठी वळाले होते व्‍यायामाकडे

सुमार पाच ते सहा वर्षांपूर्वी श्री.नलभे यांचे वजन १०५ किलोपर्यंत होते. धावण्याच्‍या आवड असल्‍याने मुंबई मॅरेथॉनमध्ये धावायचे म्‍हणून त्‍यांनी धावण्याला सुरवात केली. अथ्थक प्रयत्‍नांतून त्‍यांनी वजन ७६ किलोपर्यंत आणले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्‍यायाम, धावण्याकडे वळालेले असतांना, पुढे त्‍यांना गोडी लागली.

मॅरेथॉन स्‍पर्धांमध्ये उमटविला ठसा

आयर्नमॅन स्‍पर्धेत सहभागी होण्यापूर्वी श्री.नलभे यांनी विविध मॅरेथॉन स्‍पर्धा गाजविल्‍या आहेत. मुंबई मॅरेथॉन तीन तास ५० मिनीटांत पूर्ण करण्याची सर्वोत्तम कामगिरी करतांना तीन वेळा या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. यासोबत सातरा मॅरेथॉन दोन वेळा पूर्ण केली आहे. तर कोल्‍हापूरमध्ये २०१९ मध्ये हाफ आयर्नमॅन यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली आहे.

हेही वाचा: Success Story : कातळगावचा प्रणव बनला लढाऊ विमानाचा पायलट!

दीड वर्षांत पूर्ण केली तयारी

जळगाव येथे नियुक्‍ती करतांना तेथील जळगाव रनर्स ग्रुपशी जोडले गेल्‍यानंतर श्री.नलभे यांना दिशा मिळाली. प्रारंभी धावतांना व नंतर विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्‍यांनी सराव केला. सुमारे दीड ते दोन वर्षांपासून आर्यनमॅन स्‍पर्धेसाठी ते तयारी करत होते. कोरोना काळातही तयारीत खंड पडू दिला नाही. शनिवारी सुमारे दोन तास धावणे तर रविवारी चार तास सायकल चालवतांना व अन्‍य दिवशी पोहण्याचा सराव करतांना त्‍यांनी आपले कर्तव्‍य बजावतांना स्‍पर्धेची तयारी सुरु ठेवली.

"आयर्नमॅन स्‍पर्धा पूर्ण करणे आव्‍हानात्‍मक होते. ही केवळ स्‍पर्धा नसून जीवनशैली आहे. सुदृढ आरोग्‍याचा संदेश या माध्यमातून दिलेला आहे. आणखी कमी कालावधीत स्‍पर्धा पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्‍न करणार आहे." - शिवाजी नलभे, आयर्नमॅनचे मानकरी.

हेही वाचा: Nandurbar News | ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे : मनीषा खत्री

टॅग्स :Nashikironman