
Cricket : महिला T-20 स्पर्धेत मायाची भेदक गोलंदाजी; टिपले 4 बळी
नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने दमदार कामगिरी केली आहे. पुदुचेरी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) संघापाठोपाठ केरळ (Kerala) विरुद्धच्या सामन्यातदेखील चार बळी (Wickets) टिपताना तिने भेदक फिरकीने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
या स्पर्धेत माया आपल्या फिरकी (Spinner) गोलंदाजीने सामना गाजवते आहे. मंगळवारी (ता.१९) दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षटकात केवळ १२ धावा देतांना ४ बळी घेतले. यात १२ निर्धाव चेडूंचा समावेश होता. सर्वाधिक ३० धावा करणाऱ्या केरळची कर्णधार एस सजनाला त्रिफळाचित करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला. या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळला ९० धावांत रोखले. महाराष्ट्राची स्थिती ५ बाद ६५ धावा अशी असताना, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मायाने नाबाद ५ धावा करता महाराष्ट्राला १८ व्या षटकात दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणेने हातभार लावला.
हेही वाचा: Cricket Alert : नाशिकच्या तन्मयने टिपले 13 बळी
यापूर्वी पहिल्या सामन्यातदेखील काल (ता.१८) तिने चमकदार कामगिरी केली होती. आंध्र विरुद्ध प्रभावी गोलंदाजी करताना मायाने चार षटकात ३२ धावांत ४ बळी घेतले. यात ९ निर्धाव चेडूंचा समावेश होता. आंध्रच्या ७३ धावांच्या सलामीनंतर मायाने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्रला १३६ धावांत रोखण्यात महाराष्ट्राला यश आले. परंतु या सामन्यात आंध्रने महाराष्ट्र संघाला ९ बाद ९५ धावांवर रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत २१ एप्रिलला मेघालय, २२ ला हैदराबाद तर २४ एप्रिलला राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र संघाची लढत होणार आहे.
हेही वाचा: नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश
Web Title: Maya Sonavane Stormed With Bowling In Womens T 20 Take 4 Wickets Against Kerala Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..