कोजागिरी निमित्ताने दुधाचे दर शंभरी पार

कोजागिरी निमित्ताने दुधाचे दर शंभरी पार
Published on: 
एन्कर फोटो : A15086 नाशिक : बाजारात विक्रीस आलेले दूध -- मागणीमुळे दर शंभरी पार; ११० रुपये लिटरने विक्री कोजागिरी अन् दिवाळीच्या तयारीमुळे दरात वाढ सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २५ : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध आटवून प्रसादाच्या स्वरूपात त्याचे वितरण करण्याची मोठी परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २५) सकाळपासूनच दुधाला मोठी मागणी असल्याने दुधाचे दर शंभरी पार गेले. नाशिकच्या दूध बाजारात तब्बल ११० रुपये प्रतिलिटर दराने दुधाची विक्री झाली, तर शहराच्या इतर काही भागांत यापेक्षाही अधिक दराने दुधाची विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्रप्रकाशात दूध आटवून घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन गरजेपेक्षा अतिरिक्त दुधाची खरेदी केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळांकडूनही दुधाची मोठी मागणी नोंदवली गेली. त्यातच अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपल्याने, शहरात प्रसिद्ध असणारी मिठाई पार्सलच्या माध्यमातून आप्तेष्टांना पाठवण्यासाठी मिठाई विक्रेत्यांची धावपळ सुरू आहे. विविध प्रकारची अतिरिक्त मिठाई तयार करण्यासाठी विक्रेत्यांकडून दुधाचा मोठा साठा केला जात असल्याने रविवारी दुधाच्या मागणीत कमालीची वाढ झाली होती. या वाढत्या मागणीची संधी साधत व्यावसायिकांनी दरात सुमारे २५ रुपयांची वाढ केली; परिणामी दूध बाजारात ११० रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले गेले. दुधाच्या या प्रचंड मागणीमुळे बहुतांश व्यावसायिकांकडे दुधाचा तुटवडाही जाणवला. --- भाव ऐनवेळी वाढले. एरवी ८० रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे दूध कोजागिरीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी ९० रुपयांवर पोहोचले होते. कोजागिरीच्या दिवशी दुधाचा खप पाहता दर १०० ते ११० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती, ती अखेर खरी ठरली. प्रत्यक्षात दूध बाजारात ११० रुपये, तर शहराच्या अन्य भागांत त्याहून अधिक दराने प्रतिलिटर दुधाची विक्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com