esakal | वय नसले तरी लग्न लावून द्या! अल्पवयीन मुला-मुलींची लगीनघाई, पोलीस हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

minor girls and boy wedding

वय नसले तरी लग्न लावून द्या! अल्पवयीन मुला-मुलीची लगीनघाई

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (जि.नाशिक) : टीव्ही मालिकांमधील प्रेमकहाणी बघून अनेक प्रेमीयुगल लग्नगाठ बांधत असतात. असाच काहीसा प्रकार शहरातील सातपूर परिसरात घडला. वय नसतानही एका अल्पवयीन प्रेमीयुगलाने लग्न करायचे ठरवत थेट सातपूर पोलिस ठाणे गाठत वय नसले तरी आमचे लग्न लावून देण्याचा आग्रह पोलिसांना केला. अल्पवयीन प्रेमीयुगलांच्या या हट्टामुळे पोलिस यंत्रणेसह पालकही चांगलेच हतबल झाले. (minor-boys-and-girls-insistence-for-wedding-nashik-marathi-news)

लग्नगाठ बांधण्याचा निर्णय

टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये दाखविले जाणारे प्रेमाचे जीवन जगण्याचा मोह हा सध्याच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. याच मोहापायी शहरातील सातपूर भागातील अल्पवयीन प्रेमीयुगलाने असेच जीवन जगण्याचा निश्‍चय करत थेट लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. अनेक कुटुंबात आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असतात. याच संधीचा फायदा घेत घरी एकटेच असलेली मुले-मुली टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्रात रमतात आणि तसेच जगणे जगण्याची स्वप्ने रंगवितात. अशाच मालिका पाहून सातपूर भागातील अल्पवयीन मुलगा परिसरात राहणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढतात आणि दोघेही प्रेमात अडकत ‘एक दुजे के लिए’ म्हणत विवाहाचा निर्णय घेतात. आपल्या मुलीचे बदललेले वागणे पाहून मुलीच्या घरच्यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या फिरण्यावर बंधने घातली. मात्र प्रेयसीच्या वाढदिवसाची संधी साधत प्रियकराने मुलीस घरातून बाहेर काढत लग्न करायचे म्हणून थेट पोलिस ठाणेच गाठले.

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

आपल्या प्रेमाची कबुली पोलिस आधिकाऱ्यांना देत ‘साहेब, वय कमी असले तरी आमचे लग्नच लावून द्या’ असा हट्ट धरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी दोघांच्याही पालकांना बोलावून समजावून सांगितले. मात्र लग्नाच्या हट्टापुढे सर्वच हतबल झाल्याचे चित्र सातपूर पोलिस ठाण्यात पाहावयास मिळाले. या प्रकरणाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती.

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील २५ संशयितांना न्यायालयीन कोठडी

loading image