
नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता युवकाचा बुधवारी (ता. १६) सायंकाळी गोदापात्रात मृतदेह आढळून आला होता. गुरुवारी (ता. १७) केलेल्या शवविच्छेदनामध्ये गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्या डोक्यात गंभीर दुखापतही आढळली आहे. पोलिसांनी बेपत्ता युवकासमवेत पार्टीला उपस्थित असलेल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दीपक गोपीनाथ दिवे (२७, रा. डीकेनगर, गंगापूर रोड) असे मयत युवकाचे नाव आहे. (Missing Dipak Dive strangulation Findings from post mortem report Nashik Latest Marathi News)
९ नोव्हेंबरला दीपक दिवे हा मित्र विजय जाधव आणि अन्य मित्रांसमवेत गोदापार्क परिसरात दारू पार्टीसाठी जमले होते. परंतु तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिवेचा मित्र मयत विजय जाधव सहित इतर मित्रांना चौकशीसाठी बोलविले. रविवारी (ता. १३) सकाळी साडेदहा वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलाविल्यावर विजय जाधव पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर आला.
तेव्हा, ‘मी विष घेतल्याने मला चक्कर येत आहे’, असे विजय म्हणाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. दीपक हा प्लंबर असून विजय गवंडी कामे करायचा. तसेच, भुरट्या चोऱ्यांमध्येही तो संशयित होता. तर, विजयविरोधात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी बेपत्ता दीपकचा मृतदेह बुधवारी (ता. १६) सायंकाळी गोदापात्रात तरंगताना आढळला.
मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर, त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत आढळली असून, पाण्यात बुडाल्याने त्याच्या अवयवांमध्ये पाणीही मिळून आले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, चौकशीसाठी पार्टीच्यावेळी असलेल्यांना ताब्यात घेतले आहे.
म्हणूनच आत्महत्या केली नसावी?
विजय जाधव यास दीपक बेपत्ताची नोंद झाल्यापासून गंगापूर पोलिस चौकशीसाठी बोलावीत होते. परंतु तो येत नव्हता. रविवारी (ता. १३) तो विष प्राशन करूनच आला होता. पोलिस चौकशीपूर्वीच त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे त्यानेच तर दीपक दिवेचा गळा आवळून खून केला नसावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
"बेपत्ता दिवे याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी तीन-चार जणांना ताब्यात घेतले आहे." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.