विजेच्या धक्क्याने मायलेकांचा मृत्यू; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

विजेच्या धक्क्याने मायलेकांचा मृत्यू; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले
Published on: 
NSK26H35190 : सुनंदा सपकाळे NSK26H35191 : राहुल सपकाळे --- विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू --- असोदा रोड परिसरातील हृदयद्रावक घटना; दोन चिमुकलींचे पितृछत्र हरपले सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : घराच्या पाठीमागे लोंबकळणारी वीजतार कापत असताना, विजेचा धक्का लागलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईलाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत मायलेकांचा मृत्यू झाला. सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (३३, दोघे रा. असोदा रोड, झोपडपट्टी परिसर) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी (ता. १७) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. राहुल सपकाळे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आई-वडील, पत्नी आणि दोन मुलींसह ते राहत होते. मंगळवारी सकाळी घराच्या पाठीमागील बाजूस लोंबकळत असलेली वीजतार कापण्याचा प्रयत्न राहुल करीत होते. त्याच वेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का लागल्याचे पाहून आई सुनंदा यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. काठीच्या सहाय्याने राहुल यांना वीजतारेपासून दूर करण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचाही तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. हा प्रकार रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. मायलेकांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन चिमुकल्या मुलींचे पितृछत्र हरपले राहुल सपकाळे यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुली आहेत. हातमजुरी करून राहुल आई-वडील, पत्नी आणि मुलींचा सांभाळ करीत होते. कष्टातून त्यांचे हसते-खेळते कुटुंब आकार घेत होते. मात्र, एका क्षणात काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले असून, आजीचाही आधार कायमचा हिरावला आहे. घटना घडली, त्या वेळी राहुल यांची पत्नी माहेरी गेली होती. घटनेची माहिती मिळताच त्या रुग्णालयात पोहोचल्या. पती आणि सासूच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.