MPSC Exam : राज्‍यसेवा 2023 साठी 4 जूनला पूर्वपरीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC Exam : राज्‍यसेवा 2023 साठी 4 जूनला पूर्वपरीक्षा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा- २०२३ च्‍या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

६७३ पदांच्‍या भरतीसाठी होत असलेल्‍या या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २ ते २२ मार्चदरम्‍यान आहे. (mpsc Civil Services 2023 Preliminary Exam on 4th June nashik news)

४ जूनला राज्‍यभरात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. राज्‍यसेवेच्‍या अभ्यासक्रमाबाबत राज्‍यभर गदारोळ सुरू होता. आयोगाने नुकतीच याबाबत भूमिका जाहीर करताना २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करणार असल्‍याचे स्‍पष्ट केले.

यानंतर लगेचच राज्‍यसेवा २०२३ परीक्षेसंदर्भातील सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यामुळे आता स्‍पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले उमेदवार तयारीला लागणार आहेत. येत्‍या २ ते २२ मार्च या कालावधीत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

याच मुदतीत ऑनलाइन शुल्‍क भरण्याची मुदत असेल. भारतीय स्‍टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्‍क भरण्यासाठी २४ मार्चपर्यंत चलन प्रत घेण्याची मुदत असेल. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्‍क भरण्याची मुदत २८ मार्च असेल.

मुख्य परीक्षेची गुणवारी अशी

संयुक्‍त पूर्व परीक्षा ४०० गुणांसाठी घेतली जाणार आहे. तर राज्‍यसेवा परीक्षा वगळता अन्‍य सर्वांकरिता चारशे गुणांची मुख्य परीक्षा आणि पन्नास गुणांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ८०० गुणांसाठी राहील. तर मुलाखतीसाठी शंभर गुण असतील.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पोलिस खात्‍यातील जागा नाही

राज्‍यसेवा परीक्षेच्‍या माध्यमातून यंदा उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील जागांचा समावेश आहे. परंतु सहाय्यक पोलिस आयुक्‍त/पोलिस उपअधीक्षक या संवर्गातील पदांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.

प्रवर्गनिहाय भरती होणाऱ्या जागा

सामान्‍य प्रशासन विभाग (राज्‍यसेवा गट-अ, गट-ब) मध्ये २९५ जागा, पाणीपुरवठा, जलसंपदा, मृदा व जलसंधारण (महाराष्ट्र स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा) १३० जागा, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत अभियांत्रिकी सेवा) १५ जागा, अन्न व नागरी विभागात ३९, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागातील १९४ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षेनंतर संवर्गनिहाय ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. यामध्ये राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्‍टोबर, स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा १४ ऑक्‍टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा १४ ऑक्‍टोबर, निरीक्षक, वैद्यमापन शास्‍त्र, गट-ब २१ ऑक्‍टोबर, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा २८ ऑक्‍टोबरला घेण्याचे नियोजित आहे.

पदनामनिहाय भरतीसाठीच्‍या जागा

उपजिल्‍हाधिकारी (९ पदे), राज्‍यकर सहायक आयुक्‍त (१२ पदे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (३६ पदे), वित्त व लेखा सेवा विभागातील सहाय्यक संचालक (४१ पदे), सहायक कामगार आयुक्‍त (२ पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (५१ पदे),

मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी (१७ पदे), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या कार्यालयातील कक्ष अधिकारी (१ पद), सहायक गटविकास अधिकारी (५० पदे), मुख्याधिकारी (४८ पदे), उप अधीक्षक भूमिअभिलेख (९ पदे), उपअधीक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क (४ पदे), कौशल्‍य विकास,

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (११ पदे), उद्योग अधिकारी (४ पदे), सहायक कार्यकारी अभियंता (८९ पदे), सहायक अभियंता (२१ पदे), सहायक कार्यकारी अभियंता (१० पदे), जल संधारण अधिकारी (१० पदे), सहायक अभियंता (१५ पदे), वैधमापन शास्‍त्रचे निरीक्षक (३९ पदे), अन्नसुरक्षा अधिकारी (१९४ पदे).

टॅग्स :Nashikmpsc