
मुंढेगावची आदिवासी आश्रमशाळा बंद; विद्यार्थ्यांचे शाळेतच विलगीकरण
नाशिक : मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील शासकीय आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने तेथील शालेय कामकाज पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या परिसरातील इमारतींमध्ये विलिगीकरण करण्यात आले आहे. (mundhegaon tribal ashram school closed after 15 students tested positive for corona)
मुंढेगाव आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यास थंडी, ताप आल्याने या विद्यार्थ्याची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतील तीनशेहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याबरोबर येथे असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील सर्व कर्मचाऱ्यांचीही तातडीने आरटीपीसआर चाचणी घेण्यात आली. यात गुरुवारी (ता. ९) १४ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे.
शाळेचे कामकाज बंद
आश्रमशाळेतील १४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आदिवासी विकास विभागातर्फे या आश्रमशाळेतील कामकाज पुढील काही दिवसांसाठी थांबविण्यात आले. परंतु, सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडल्यास संसर्ग वाढण्याची भिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: नाशिक | आदिवासी महामंडळ बोगस नोकर भरती प्रकरणी दोघांवर गुन्हा
काळजी घेण्याच्या सूचना
मुंढेगाव येथे आश्रमशाळेसह मध्यवर्ती स्वयंपाकगृह देखील आहे. या स्वयंपाकगृहामधून ३९ शासकीय आश्रमशाळांतील मुलांना सकाळच्या नाष्टापासून सायंकाळचे जेवणदेखील पुरविले जाते. त्यामुळे स्वयंपाकगृहातील जेवणाचे वितरण करणारे कर्मचारी हे शाळेतील लोकांच्या संपर्कात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह असले, तरी हे कर्मचारी जेथेजेथे जातात, त्या सर्वच शाळांच्या मुख्यध्यापकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. यासह एखाद्या विद्यार्थ्यांस थंडी, ताप व इतर त्रास जाणवत असल्यास त्यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना देखील मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: नाशिक : ओमिक्रॉनच्या धास्तीने लसीकरणाचा वाढला टक्का
Web Title: Mundhegaon Tribal Ashram School Closed After 15 Students Tested Positive For Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..