पंचवटीतील जुन्या वाड्यांचा प्रश्‍न गंभीर! यंदाही १६६ घरमालकांना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old house

एकीकडे मनपा प्रशासन संबंधितांना नोटीस देत सोपस्कार पार पाडत आहे, तर दुसरीकडे जीर्ण झालेल्या वाड्यांचे मालक काणाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्ये पंचवटीतील जुन्या वाड्यांचा प्रश्‍न गंभीर!

पंचवटी : विभागातील मोडकळीस आलेल्या तब्बल १६६ घरमालकांना महापालिका पंचवटी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. एकीकडे मनपा प्रशासन संबंधितांना नोटीस देत सोपस्कार पार पाडत आहे, तर दुसरीकडे जीर्ण झालेल्या वाड्यांचे मालक काणाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. (municipal corporation has issued notices to 166 owners of dilapidated houses nashik )

नोटिशींकडे घरमालकांचा कानाडोळा

वाढत्या कोरोना प्रसारामुळे प्रशासन उपाययोजनेत गर्क आहे. दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर जीर्ण वाड्यांच्या मालकांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार संबंधितांना पार पाडावे लागत आहे. कारण गत दोन वर्षात पंचवटी विभागात नव्हे पण जुन्या नाशिकमध्ये जीर्ण वाडे कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या प्रशासनाने संबंधितांना नोटीस देत इशारा दिला आहे. गतवर्षी पंचवटी विभागातील तब्बल १८८ मालकांना धोकादायक वाडे उतरविण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. यंदा त्यात घट होऊन केवळ १६६ घरमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीची हे सोपस्कार पार पाडले जात असले तरी अनेक घरमालक त्याकडे साफ काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

अनेक पिढ्यांचे वास्तव्य

पंचवटीसह जुन्या नाशिकमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर जुने वाडे आहेत. याठिकाणी अनेकांच्या तीन चार पिढ्या जन्मल्या अन् वाढल्या. यातील काहींनी राहत्या घरावर कब्जा केला आहे, तर काहींनी नवीन घर घेऊनही जुन्या ठिकाणचा हक्क अबाधित राहावा म्हणून संबंधित घराला कुलूप ठोकले आहे. यामुळे अनेक ठिकाणी घरमालक व भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात गेला आहे.

तडजोडीचे प्रयत्न
जुन्या वाड्यांपैकी अनेक भाडेकरूंचे घरमालकाशी जिव्हाळ्याचे नाते आहे, तर काही ठिकाणी वादावादीनंतर थेट हाणामारीपर्यंत प्रकरणे गेल्याचेही उदाहरणे आहेत. मात्र काही ठिकाणी संबंधित घरमालक व भाडेकरू यांच्या पुढील पिढीत आर्थिक तडजोडींद्वारे हा प्रश्‍न सोडविला जात आहे. कारण अद्यापही अनेक भाडेकरूंना दहा वीस रुपयांपासून शंभरच्या आत घराचे भाडे आहे. अशा परिस्थितीत संबंधित मालक घराची दुरुस्ती कशी करणार, हा प्रश्‍नच आहे. याशिवाय अनेक ठिकाणची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने भाडेवसुलीही थांबली आहे.

हेही वाचा: अजित पवार म्हणाले, तुमच्या स्वप्नातल्या घराची लॉटरी लागेल!

''मनपाच्या पंचवटी विभागातर्फे मोडकळीस आलेल्या घरमालकांना नोटिसा देण्याचे काम सुरू आहे, परंतु अनेक ठिकाणची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईस बंधने येत आहेत.''
- विवेक धांडे, विभागीय अधिकारी, मनपा, पंचवटी विभाग

(municipal corporation has issued notices to 166 owners of dilapidated houses nashik )

loading image
go to top