माजी कुलसचिवासह पुत्राचा खून; संपत्तीसाठी केलं कृत्य

Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News
Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News
Updated on

नाशिक : कोट्यवधींच्या प्रॉपर्टीच्या लोभातून एकाने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (वय ७०) व त्यांचा एमबीबीएस असलेला मुलगा डॉ. अमित (वय ३५) या दोघा बाप-लेकाचा आठवडाभरात खून करून मृतदेह जाळून पालघर व नगर जिल्ह्यात निर्जनस्थळी विल्हेवाट लावली.

याचदरम्यान संबंधितांच्या मोबाईलवरून ऑनलाइन ट्रँन्झॅक्शन करीत त्यांच्या नावावरील ९६ लाखांच्या शेअरच्या रकमेचा परस्पर व्यवहार करीत कुणाला संशय येऊ नये म्हणून काही देणी चुकवीत, थंड डोक्याने दुहेरी खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. राहुल गणपत जगताप (वय ३६, अनिता अपार्टमेंट, आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दुहेरी खून प्रकरणासंदर्भात बुधवारी (ता. १६) माहिती दिली. ते म्हणाले, की मृत कापडणीस पिता-पुत्र आणि संशयित जुनी पंडित कॉलनीत आनंद गोपाळ पार्क येथे राहायचे. संशयित राहुल जगताप याने इमारतीत राहणाऱ्या डॉ. अमित कापडणीस यांच्याशी झालेल्या तोंडओळखीतून या कुटुंबाच्या प्रॉपर्टीची माहिती घेत १६ ते १७ डिसेंबरला नानासाहेब कापडणीस यांचा पहिल्यांदा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील जव्हार-आंबोलीदरम्यान जाळून त्या भागातील दरीत फेकून दिला. त्यानंतर दहा दिवसांनंतर २६ ते २७ डिसेंबरच्या दरम्यान त्यांचा मुलगा डॉ. अमित याचा खून करून त्यांचाही मृतदेह स्पिरिट टाकून जाळला. जाळलेला मृतदेह राजूर (नगर) जिल्ह्यात निर्जन भागात फेकून दोन्ही खुनांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News
महाराष्ट्राचे दोन सुपुत्र जवान गणेश कसबे, अशोक इंगवले यांना वीरमरण

मृताच्या नावाने आरटीजीएस

मृत कापडणीस कुटुंबाची शहर-जिल्ह्यात कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. ९६ लाखांचे शेअर, ५० लाखांच्या आसपास मुदतठेवी, पंडित कॉलनीत चार सदनिका, देवळाली भागात रो-हाउस, नानावली भागात गाळा, याशिवाय गंगापूर रोडला सावरकरनगर भागात तीनमजली इमारतीचे काम सुरू आहे. नानासाहेब कापडणीस यांच्या खुनानंतर संशयिताने त्यांच्या मोबाईलद्वारे डिमॅट खात्यावरून त्यांचे ९६ लाखांचे शेअर विकून कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यातील काही रक्कम त्यांचा मुलगा अमित याच्या खात्यावर टाकली. थंड डोक्याने कामकाज करीत दोन्ही खुनांच्या गुन्ह्यात गुंगारा देत राहिला. शेअर विक्रीनंतर त्याने मृत कापडणीस यांच्या डिमॅट खात्याला जोडलेल्या मोबाईलच्या माध्यमातून लाखोंची रक्कम आरटीजीएस केली.

असा झाला उलगडा

मृत कापडणीस यांची मुलगी मुंबईत नोकरीला असल्याने त्यांची पत्नी मुलीसोबत मुंबईत राहायची, याची संशयिताला माहिती नव्हती. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्राच्या खुनानंतर प्रॉपर्टी आपलीच होईल, या लोभामुळे त्याने कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र यादरम्यान एक घटना घडली. त्यांच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर फोन केला पण संशयिताला त्यांना पत्नी व मुलगी आहे, हे माहिती नसल्याने तो गांगरला. चुका करत गेला. त्यांच्या मुलीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात वडील व भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे माहिती घ्यायला सुरवात केली. बेपत्ता कापडणीस यांच्या शेअर विक्रीची रक्कम प्रदीप जगन्नाथ शिरसाठ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी शिरसाठची चौकशी केली असता त्याने मी मॅनेजर असून, मालक राहुल जगताप यांच्या सांगण्यावरून ही रक्कम वळविल्याची माहिती दिली. त्यानंतर राहुल जगताप हा पोलिसांच्या जाळ्यात आला.

Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

थंड डोक्याने कृत्य


संशयित राहुल जगताप याने कापडणीस यांच्या खुनानंतर त्यांच्या मोबाईलवरून अनेक व्यवहार केले, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. याचदरम्यान गंगापूर येथील सावरकरनगर येथे त्यांच्या बंगल्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी देणेकऱ्यांनी पैसे मागितले. त्याने परस्पर मोबाईलवरून कापडणीस यांच्या नावाने देणे चुकविले. त्यानंतर महापालिकेची नोटीस आली, की बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धूळ उडते, त्याभोवती आवरण करा, तिथे शेड उभारले. त्यानंतर इमारतीतील लोकांना संशय येऊ नये व कापडणीस कुटुंब त्यांच्या नव्या जागेत राहायला गेले हे भासविण्यासाठी त्याने पंडित कॉलनीतील घरातील साहित्य तेथून हलविले. अचानक त्यांच्या मुलीचा फोन आल्यावर तिलाही हेच सांगितले. पण अद्याप बंगल्याचे काम पूर्णच नसताना वडील आणि भाऊ नव्या घरी राहायला जातील कसे, असा तिला प्रश्न पडला आणि घातपात झाल्याचा संशय बळावत गेला.

Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News
Realme चे दोन नवीन स्मार्टफोन; मिळेल दमदार कॅमेरा अन् अनेक भन्नाट फीचर्स

दहा दिवसांची कोठडी

पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस नाईक थेटे, लोंढे, पवार, भोये, खाडे आदींच्या पथकाने हा तपास केला. संशयिताच्या प्राथमिक जबाबातील माहितीची पडताळणी करीत, दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जात तेथील गुन्ह्याची माहिती घेत आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव केली. बुधवारी दुपारी न्यायालयापुढे हजर केले असता संशयित जगताप याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित जगताप काही दिवस विदेशात राहायचा. २०११-१२ पासून नाशिकला कार्यरत आहे. त्याचे जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. त्याचे कपड्याचे दुकान आहे. गो फिश नावाचे हॉटेल आहे. शेअर मार्केटमधील इन्ट्रा डे व्यवहारात तो तरबेज असल्याचे पुढे आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com