धुळे ः टुडे १ साठी, मेन
---
लोगो छायाचित्र क्रमांक ः 35032
---
बिनशेती जमिनींचा वार्षिक ‘एनए’ कर रद्द
दुहेरी करपद्धतीतून नागरिकांची सुटका; ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ ः बिनशेती (एनए) जमीन आणि भूखंडधारकांना दर वर्षी भरावा लागणारा अकृषिक कर शासनाने कायमस्वरूपी रद्द केला आहे. यामुळे महसूल विभागाचा अकृषिक कर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्स), अशा दुहेरी करपद्धतीतून नागरिकांची सुटका झाली आहे. आता वार्षिक कराऐवजी संबंधित जमीन व भूखंडधारकांना शासनाने निश्चित केलेले एकरकमी अधिमूल्य (वन टाइम प्रिमियम) एकदाच भरावे लागणार आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, या मुदतीत रक्कम भरून दंड व व्याजाचा भुर्दंड टाळावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अधिनियम २०२५ अन्वये बिनशेती परवानगी, सनद आणि वार्षिक अकृषिक आकारणीच्या जुन्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील ३१ डिसेंबर २०२५, तसेच १० फेब्रुवारी २०२६ आणि २३ एप्रिल व १२ ऑक्टोबर २०२६ च्या शासकीय अधिसूचना, निर्णय आणि परिपत्रकांनुसार एकरकमी अधिमूल्याची गणना व वसुली करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे.
निर्णायाचे ठळक वैशिष्ट्ये
अधिमूल्य असे ठरणार : जमीन ज्या वर्षी बिनशेती झाली, त्या वर्षीचे शासकीय वार्षिक दर विवरणपत्र (रेडी रेकनर) आणि जमिनीचे क्षेत्रफळ यानुसार रक्कम निश्चित होईल. जुन्या जमिनींसाठी सवलत : ३१ डिसेंबर २००१ ला किंवा त्यापूर्वी बिनशेती झालेल्या जमिनींसाठी २००१ चे रेडी रेकनर दर ग्राह्य धरले जातील. १ जानेवारी २००२ नंतरच्या जमिनींसाठी संबंधित वर्षाचे दर लागू राहतील. गृहनिर्माण संस्थांचाही समावेश : ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीचे ‘मानीव अभिहस्तांतरण’ (डीम्ड कन्व्हेयन्स) झाले आहे, त्यांनाही अधिमूल्य भरावे लागेल. मानीव अभिहस्तांतरण झालेल्या तारखेच्या रेडी रेकनर दरानुसार ही रक्कम आकारली जाईल. नोंदणीची हमी : अधिमूल्य भरल्यानंतर त्याची अधिकृत नोंद संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर किंवा मिळकत पत्रिकेतील ‘इतर हक्क’ सदरात घेतली जाईल.
भरणा प्रक्रिया, मुदत
संबंधित तहसील कार्यालयांकडून जमिनीचे मूल्यांकन करून जमीनधारकांना भरावयाच्या रकमेची नोटीस बजावली जाईल. नागरिकांनी या नोटिशीची दखल घेऊन निश्चित केलेली रक्कम ऑफलाइन चलनाद्वारे शासनाकडे जमा करायची आहे. यात ३१ डिसेंबर २०२६ ही अधिमूल्य भरण्याची अंतिम मुदत आहे. मुदतीनंतर थकीत रकमेवर दंड आणि व्याजाची आकारणी केली जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व बिनशेती जमीनधारक, भूखंडधारक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अधिमूल्य भरावे व त्याची महसूल अभिलेखात नोंद झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---
१४-१
चौकट
क्षेत्रफळानुसार आकारणीचे दर (कलम ४७ नुसार)
जमिनीचे क्षेत्रफळ ............................ अधिमूल्याचा दर (बाजारमूल्याच्या)
१,००० चौ. मीटरपर्यंत .................................... ०.१० टक्के
१,००१ ते ४,००० चौ. मीटरपर्यंत ........................ ०.२५ टक्के
४,००० चौ. मीटरपेक्षा अधिक ............................ ०.५० टक्के