Namami Goda Project : सिंहस्थापूर्वी ‘नमामी गोदा’ प्रकल्प साकारणार! मलजलवाहिन्यांची GIS Mapping | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Namami Goda Project news

Namami Goda Project : सिंहस्थापूर्वी ‘नमामी गोदा’ प्रकल्प साकारणार! मलजलवाहिन्यांची GIS Mapping

नाशिक : गंगा नदीच्या धर्तीवर गोदावरी नदीचे शुद्धीकरण व सौंदर्यीकरण करण्याच्या ‘नमामी गोदा’ प्रकल्पाला चालना मिळाली असून प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

सहा महिन्यात अहवाल तयार करण्याबरोबरच केंद्राकडून मान्यता घेण्याची जबाबदारीदेखील सल्लागार संस्थेवर राहणार आहे. प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी आजपासूनच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. (Namami Goda project will be realized before Simhasta kumbh mela GIS Mapping of sewers nashik news)

माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून नमामी गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी केंद्र सरकारकडून नमामी गोदा प्रकल्प अमलात आणला जात आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यात आले, परंतु पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे कार्यारंभ आदेश देण्यास विलंब झाला.

दोन दिवसांपूर्वी अलमंडस् ग्लोबल लिमिटेड व नांगिया ॲन्ड कंपनी, दिल्ली या सल्लागार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. आगामी सिंहाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नमामि गोदा प्रकल्प हाती घेतला आहे.

त्यासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाकडे अठराशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावांतर्गत नमामी गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत गोदावरी व उपनद्यांना लागून असलेल्या दीडशे किलोमीटर लांबीच्या मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती केली जाणार आहे.

त्याचबरोबर उपनद्यांमध्ये वाहणारे मलजल अडविले जाणार आहे. कामटवाडे व मखमलाबाद येथे मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार आहे. नवनगरांमध्ये दोनशे ते सहाशे मिलिमीटर व्यासाच्या मलवाहिका टाकल्या जाणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नदीकाठी सुशोभीकरण करण्याबरोबरच घाटांचा विकास करणे, हेरिटेज डीपीआर तयार करणे, महापालिका क्षेत्रातील प्रदूषित पाणी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून रिसायकल करून पुन्हा नदीत सोडले जाणार आहे.

संस्थेला सतरा कोटी

या प्रकल्प अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने सल्लागार संस्था नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सल्लागार संस्था नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रकल्प सल्लागार म्हणून संस्थेला सतरा कोटी रुपये अदा केले जाणार आहे.

यातील सात कोटी रुपये केंद्रांकडून मान्यता मिळाल्यानंतर संस्थेला अदा केले जाणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. अशी माहिती अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

"जेवढ्या गतीने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने नमामी गोदा प्रकल्पाला चालना दिली. त्या तुलनेत महापालिका प्रशासनाच्या कामाचा वेग नाही. सल्लागार संस्थेने तरी वेळेत प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र सरकारला सादर करावा."

- सतीश कुलकर्णी, माजी महापौर.

टॅग्स :NashikGodavari River