श्रद्धांजली नाना पाटेकर

श्रद्धांजली नाना पाटेकर
Published on: 

नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार आणि ह्रदयाला स्पर्श करणाऱ्या अभिनयातून मानवी अनुभवाच्या एका विस्तृत श्रृंखलेला जिवंत केले. त्यांच्या भूमिकांनी लोकांचे मन आणि हृदयावर मोठी छाप टाकली. समाजसेवेसाठीचे त्यांचे समर्पण हे वंचितांच्या प्रतीची चिंता दर्शवते.
द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
------------------
नाना पाटकेर यांनी अभिनयातून आणि विविध व्यक्तिरेखांमधून भारतीय चित्रपटसृष्टीवर तसेच प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटविला आहे. या दुःखाच्याप्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती संवेदना.
राहुल गांधी, कॉंग्रेस नेते
----------
नाना पाटेकर हे अभिनयाच्या क्षेत्रात महान होतेच पण शेतकरी आणि वंचितांच्या प्रती त्यांना असलेली संवेदना ही देखील सदैव लक्षात ठेवली जाईल.
मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
--------------
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक ''नटसम्राट'' गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला.महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
-------------
‘अंकुश’, ‘प्रहार’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांत काम करताना त्यांनी भूमिकांमध्ये वास्तवता आणि गांभीर्य आणले. त्यांचा आवाज, व्यक्तिमत्त्व आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पूर्णपणे सामावून जाण्याची क्षमता त्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवत होती.
राजनाथसिंह, संरक्षणमंत्री
----------------
नाना पाटेकर यांनी चार-पाच दशकांपेक्षा जास्त काळ नैसर्गिक अभिनयशैली आणि दमदार संवादाच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली. गंभीर सामाजिक मुद्दे असोत किंवा हास्य,व्यंग, प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव ओतून काम केले.
अमित शहा, गृहमंत्री
--------------
संवादफेकीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासासाठी केलेले त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांसाठी आधार ठरला. नाना केवळ उत्कृष्ट कलाकार नव्हते, तर समाजाप्रती संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
------------
नाना पाटेकर यांच्या नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयाने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटवला. त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले
नितीन नवीन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
----------
अभिनयात कौशल्य प्राप्त करण्याबरोबरच नाना पाटेकर यांनी आपल्या सामाजिक कार्यातूनही अनेकांना प्रेरणा दिली. अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
-------------------
मला नाना पाटेकर हे अत्यंत सरळ आणि जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आठवतात. त्यांच्या कामातही तोच प्रामाणिकपणा दिसायचा. मराठी असो वा हिंदी, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत ते वास्तवता आणायचे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले.
सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
-------------
आजही ही बातमी खरी आहे, असे वाटत नाही. नाना अत्यंत तंदुरुस्त आणि शिस्तबद्ध जीवन जगत होता. १९७८ मध्ये ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकापासून दोघांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तो सरळ स्वभावाचा होता आणि गरजूंच्या मदतीसाठी तो तत्पर असायचा.
अशोक सराफ, अभिनेते
----------------
नानांनी एका चित्रपटात माझी भूमिका साकारली होती. त्यासाठी ते हेमलकसा (गडचिरोली) येथे सुमारे महिनाभर राहिले होते. बाबा आमटे यांच्या कार्याने ते खूप प्रभावित झाले होते. ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते. ते आता आपल्यात नाहीत, हे स्वीकारणे खूप वेदनादायी आहे.
प्रकाश आमटे, सामाजिक कार्यकर्ते
--------------
आवाज, अभिनयातील उत्कटता आणि प्रत्येक भूमिकेतील प्रामाणिकपणा... त्यांची स्वतःची अशी एक वेगळी शैली होती. ‘वेलकम’मध्ये आणि त्यानंतर अलीकडेच ‘हाऊसफुल ५’ मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शब्दांत व्यक्त करता येणार नाही, इतकी तुमची उणीव भासेल.
अक्षयकुमार, अभिनेता
--------------
असामान्य अभिनय आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थिती असलेल्या या अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवला. त्यांचा कलात्मक प्रवासही वैशिष्ट्यपूर्ण होता. पडद्याबाहेर शेतकऱ्यांबद्दलची त्यांची करुणा आणि फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य गरजूंच्या मदतीसाठी असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक होते.
चिरंजीवी, ज्येष्ठ अभिनेते
---------
नाना पाटेकर हे असाधारण कलाकार आणि त्याहूनही महान माणूस होते. त्यांनी आपल्या सभोवतालच्या लोकांचे जीवन समृद्ध केले. पडद्यापलीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य तसेच कारगिल युद्धाच्या काळात केलेली सेवा त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची साक्ष देते.
कमल हसन, ज्येष्ठ अभिनेते
-------------
‘नानाजी आता आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि आप्तेष्टांप्रती माझ्या संवेदना
रजनीकांत, ज्येष्ठ अभिनेते
----------------
भाऊ... नाना साहेब. कमालीचे प्रामाणिक आणि प्रभावी. कायम प्रेम आणि आदर
परेश रावल, ज्येष्ठ अभिनेते
-----------
असामान्य व्यक्तिमत्त्व आणि अभिनयकलेतील दिग्गज कलाकार. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आणि कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा कायम स्मरणात राहील.
मनिषा कोईराला, अभिनेत्री
-----------------------
‘बिनधास्त, दिखावा नसलेले आणि अत्यंत कठीण गोष्टीही स्वतःच्या पद्धतीने सांगणारे. मित्रा, तुझी उब आणि तुझ्या मिठीची आठवण येत राहील
अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते
----------------
महान कलाकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि विस्मरणीय आवाज. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक अनमोल आणि दिग्गज कलाकार गमावला
माधुरी दीक्षित, अभिनेत्री
---------------
इतका कणखर माणूस अचानक आपल्यातून निघून गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाही.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा
---------------------
नाना स्पष्टवक्ते होते, पण मनाने खूप चांगले होते. त्यांना खाणं, व्यायाम, पुस्तकं वाचणं, लिहिणं आणि सिनेमा पाहणं आवडायचं. स्वयंपाक करणं त्यांच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन होतं. भूमिकेसाठी त्यांची मेहनत अफाट होती. ‘प्रकाश बाबा आमटे’च्या सेटवरच्या अनेक आठवणी आहेत. या चित्रपटातील प्राण्यांसोबत मैत्री करण्यासाठी नानांनी खूप मेहनत घेतली.
समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
-----------------
नाना नाना होते. आमच्या नात्यात जितकी गोडी होती, तितकंच त्यात तिखट-मीठही होतं. आमच्या नात्यात मतभेद होते, पण त्यापलीकडे एक आपलेपण होतं. खरं सांगायचं तर मी ‘पक पक पकाक २’ही लिहिला होता आणि त्यात नानांनी काम करावं, असं माझं स्वप्न होतं. नानांसोबत पुन्हा काम करण्याचं ते स्वप्न आता अपूर्ण राहिलं आहे.
गौतम जोगळेकर, अभिनेता व दिग्दर्शक
--------------
कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराच्या कामाकडे इतक्या बारकाईने पाहणं आणि आवर्जून फोन करून त्याचं कौतुक करणं, ही नानांची खासियत होती. नानांसोबत फार मोठा सहवास नसला, तरी त्यांचं काम पाहणं, त्यांच्याकडून मिळणारं कौतुक आणि त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास जवळून पाहता येणं, या आठवणी माझ्यासाठी कायम महत्त्वाच्या राहतील.
विजय पाटकर, अभिनेते
.................
शब्दांपलीकडचं दुःख झालं आहे...दुःखाने सुन्न झाले आहे. ही बातमी धक्कादायक, मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत दुःखद आहे. ज्यांचं व्यक्तिमत्त्व शब्दांत कधीच सामावू शकत नाही, अशा व्यक्तीबद्दल नेमकं काय लिहावं? मराठी रंगभूमीचा एक महान आधारस्तंभ आणि एक उत्तम माणूस… आमचे नाना.
उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री
..........................
एक दिग्गज अभिनेते, प्रभावी आवाज आणि असामान्य कलाकार म्हणून त्यांनी आपल्या दमदार अभिनयातून आणि पडद्यावरच्या वैशिष्ट्यपूर्ण उपस्थितीतून भारतीय चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान दिले. त्यांचा अभिनय आणि त्यांनी निर्माण केलेला ठसा कायम स्मरणात राहील.
अरुण गोविल, अभिनेते
....................
सामान्य कुटुंबातून आलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर मिळवलेलं स्थान प्रेरणादायी आहे. आज एका कलाकाराच्या जाण्याचं दुःख तर आहेच; पण त्याहूनही अधिक दुःख अशा माणसाच्या जाण्याचं आहे, ज्याने आपल्या आयुष्यात इतरांसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि गरजू कुटुंबांसाठी त्यांनी केलेलं सामाजिक कार्यही कायम स्मरणात राहील.
मनोज जोशी, अभिनेते
.........
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह रंगभूमी नाना पाटेकर यांना नेहमीच स्मरणात ठेवेल.पडद्यावर खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’ म्हणून, कोणताही स्वार्थ न ठेवता मैत्री जपणारे एक उत्तम मित्र म्हणून, स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहणारे मनस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून आणि आईसारखा उत्तम स्वयंपाक करणारे गृहस्थ म्हणून...तुम्ही एक आनंदी स्वभावाचे, आगळेवेगळे तत्त्वज्ञ आणि समाजसेवक होता.
सुभाष घई, दिग्दर्शक
----------
आज शब्द थिजले आहेत. काळजावर जणू वीज कोसळली आहे. नाना गेले... या एका वाक्याने मन सुन्न, निःशब्द झाले आहे. तुम्ही अभिनयाचे आकाश होतात. ज्याला तुलनेची सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात तुम्ही अढळ घर केले. मराठी चित्रपटात तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
रितेश देशमुख, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.