फोटो क्रमांक ः 31765
डोणजे (पुणे) ः अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह प्रदीप पानपाटील. (संग्रहीत छायाचित्र)
---
नानांच्या खास कपाटात राहायचे धुळ्यामधील नागलीचे पापड
---
‘नाम’च्या सदस्याकडून आठवणीला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत, दिग्गज अभिनेते आणि ‘नाम’ फाउंडेशनचे आधारस्तंभ नाना पाटेकर यांच्या निधनाने खानदेशातील नाट्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त होत आहे. याच शोकसागरात धुळेकरांनी लाडक्या अभिनेत्यासोबतच्या जुन्या व जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला.
जळगाव दौऱ्यात खानदेशच्या नागलीच्या पापडांची पडलेली भुरळ असो वा धुळ्यात खाल्लेली चविष्ट पिठलं-भाकरी, नानांचे खानदेशप्रेम यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
‘नाम’ संस्थेचे धुळे येथील सदस्य प्रदीप पानपाटील यांनी नाना पाटेकरांसोबतच्या एका खास आठवणीला उजाळा दिला. नाम संस्थेतर्फे ३० ऑक्टोबर २०१५ ला जळगाव दौऱ्यावर असताना, नाना पाटेकर यांना खानदेशातील नागलीचे पापड विशेष आवडले होते. त्यानंतर नाम संस्थेच्या धुळ्यातील सदस्य पानपाटील यांच्याकडून त्यांना नियमितपणे हे पापड पाठवले जात असतं. विशेष म्हणजे नाना हे नागलीचे पापड त्यांच्या खास कपाटात सुरक्षित ठेवत आणि ते कुणालाही देत नसतं, अशी भावनिक आठवण श्री. पानपाटील यांनी सांगितली.
पिठलं-भाकरीची मेजवानी
या शोकाकूल वातावरणात कवी जगदीश देवपूरकर यांनीही नाना पाटेकरांच्या धुळे भेटीच्या जुन्या आठवणी जागृत केल्या. येथील मूळ रहिवासी जितेंद्र छोटू देवपूरकर ४० वर्षांपूर्वी पुण्यातील ‘पिंगळे ऑडिओ’ कंपनीत कार्यरत होते. त्यावेळी पुण्यात नाट्यगृहाची कामे सुरू असताना, नाना पाटेकर आणि जितेंद्र यांची घट्ट ओळख झाली. धुळे येथील दिवंगत रंगकर्मी यादव खैरनार पुणे येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत असताना, नाना पाटेकरांच्या परिचयाचे झाले होते. सुमारे ५० वर्षांपूर्वी नाना पाटेकर धुळ्यात आले होते. गणेश कॉलनीतील डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. त्या वेळी प्रा. सबनीस यांच्या आईच्या हातची चविष्ट पिठलं-भाकरी आणि मिरचीचा ठेचा याचा नानांनी मनसोक्त आस्वाद घेतला होता, अशी आठवण श्री. देवपूरकर यांनी उजागर केली. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे धुळ्यासह खानदेशशी त्यांचे असलेले आत्मीक संबंध आणि साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, धुळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.