
Nashik News: नांदगाव बाजार समितीची निवडणूक जाहीर; 7 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष
नांदगाव (जि. नासिक) : तालुक्यातील नांदगाव व मनमाड या दोन बाजार समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. तब्बल सात वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
२८ एप्रिलला बाजार समितीच्या निवडणूकीसाठी मतदार होत आहे. निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकारण मात्र ढवळून निघणार आहे. (Nandgaon Market Committee Election Announced Taluka focus on election held after 7 years Nashik News)
नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीची तालुक्यातील रणधुमाळी सुरु झाली असून अनेक इच्छुकांच्या गोटात आपली वर्णी कुणाकडून लावून घ्यावी यासाठीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
प्रक्रिया २७ मार्चपासून सुरु होत असल्याने सध्या इच्छुकांच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नांदगावच्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
येवला येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.
दरम्यान बाजार समितीसाठी संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ग्रामपंचायत सोसायटी व्यापारी हमाल-मापारीं गटासाठी एकूण मतदार संख्या एक हजार सहाशे ६४ एवढी असून ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी ५७३ मतदार, सोसायटी गटाच्या अकरा जागांसाठी ६२३ मतदार व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी ३५६ मतदार असून तर हमाल-मापारीं गटासाठी एकूण ११२ मतदार आहेत.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
सर्वांची प्रतिष्ठा पणाला
सात वर्षापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखालील किसन विकास पॅनलच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिवनेरी शेतकरी पॅनल अशी अटीतटीची लक्षवेधी चुरस सर्वांना पहावयास मिळाली होती.
अठरा पैकी व्यापारी गटातील दोन जागांचा अपवाद वगळता सुहास कांदे,बापूसाहेब कवडे यांच्या शिवनेरी शेतकरी पॅनलने सोळा जागा जिंकून दणदणीत एकतर्फे विजय मिळविला होता. गेल्या वर्षी २७ एप्रिलला बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
आता सात वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीत आता मतदार कोणाला कौल देणार हे पाहावे लागणार आहे. या निवडणुकीमुळे सर्व पदाधिकारी, आजी, माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे नक्की.