(टुडे पान एक मेन लिड)
फोटो : NSK26H34335/ NSK26H34336
नंदुरबार : धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालय आवाराबाहेर थांबलेले न्यायालयीन कर्मचारी, वकील बांधव आणि नागरीक. दुसऱ्या छायाचित्रात श्र्वानपथकामार्फत परिसराची तपासणी करताना पथक.
------------------
जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई- मेल
पोलिसांकडून तीन तास तपासणी; संशयास्पद वस्तू न आढळल्याने सुटकेचा नि:श्वास
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : येथील जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई- मेल प्राप्त झाला होता. यामुळे संपुर्ण परिसर तातडीने रिकामा करण्यात आला होता. न्यायालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती कळविल्यानंतर बॉम्ब पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. शोध पथकातर्फे परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात परिसरात कुठलीही संशयास्पद वस्तु आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.
-------
नंदुरबार जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई- मेल प्राप्त झाला होता. त्यात जिल्हा न्यायालय ३.११ वाजता उडवून देण्याची धमकी दिली होती. हा ई- मेल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय प्रशासनाने तातडीने याबाबत पोलिसात खबर दिली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे अधिकारी तत्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले. त्याचप्रमाणे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू होती. या वेळी संपूर्ण न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला होता. तपासणीदरम्यान, न्यायालयीन कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले होते. पोलिसांकडून न्यायालयाच्या इमारतीत असलेले प्रत्येक दालन, परिसर, पार्किंगची जागा आदी भागात संशयित वस्तूंची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदरचा ई- मेल कोणी पाठविला, कुठून पाठवला गेला यबाबतचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.
----------
जिल्हा न्यायालयाच्या ई- मेलवर धमकीचा मेल आलेला होता. यात बॉम्बने जिल्हा न्यायालय उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाची इमारत रिकामी केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर अशी कोणतीही संशयास्पद वस्तू याठिकाणी आढळून आलेली नाही. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- मनोज मोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, नंदुरबार
-------------
नंदुरबार जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई- मेल न्यायालयाला प्राप्त झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने यंत्रणा न्यायालय परिसरात दाखल झाली होती. या वेळी बॉम्बशोधक पथक, श्वान पथक मागविण्यात आले होते. सुमारे २ ते ३ तास न्यायालय परिसरात कसून तपासणी केली.
- अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार