esakal | नाशिक: पोलिस शिपायाने अल्पवयीन मुलीचे केले अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! पोलिस शिपायानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

धक्कादायक! पोलिस शिपायानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिसांनी संशयितासह पिडित मुलीला अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेला दीपक जठार हा पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रविवारी (ता.१२) दुपारी घेऊन गेला होता, अशी तक्रार पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी सोमवारी (ता.१३) सकाळी म्हसरूळ पोलिसांकडे केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने शोध मोहीम राबविली.

दोघांचेही मोबाईल बंद असल्याने तपासात अडचण निर्माण झाली मात्र पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन दुपारी नांदूर नाका परिसरातून संशयित दीपक व पीडित मुलीस ताब्यात घेतले. यावेळी संशयिताची कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी धनश्री पाटील या पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या पिडित मुलीशी संशयित दीपक याची जवळपास दीड वर्षापासून ओळख असल्याचे बोलले जात आहे. याच ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे संशयित दीपक हा विवाहित आहे.

"पीडितेच्या आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर गुन्हे शोध पथकामार्फत तपासाची सूत्रे वेगाने फिरवून संशयितासह पीडितेला ताब्यात घेतले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संशयितावर पुढील कारवाई केली जाणार आहे. महिला अधिकारी धनश्री पाटील यांनी मुलीचे जबाब घेतले असून, त्या पुढील तपास करीत आहेत."- भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे.

loading image
go to top