नाशिक : पाणीपट्टी भरण्यासाठी लवकरच ॲप्लिकेशन

प्रायोगिक वापरानंतर १५ मेपासून प्रत्यक्ष वापर शक्य
water bill
water bill sakal

नाशिक : कर्मचारी नाही म्हणून चार चार वर्षे पाणी बिल मिळत नाही. पाणी मीटरचे रीडिंग होत नाही. या सगळ्या दुखण्यातून कायमची सुटका होणार आहे. महापालिकेतर्फे लवकरच ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे घरबसल्या नागरिकांना पाणीपट्टी भरता येणार आहे. पंधरा दिवसांच्या प्रायोगिक वापरानंतर साधारण १५ मेपासून प्रत्यक्ष वापरात येणार आहे.

या अ‍ॅपद्वारे नागरिकांना आपल्या पाणी मीटरची स्वतःच रीडिंग घेऊन बिलाची मोजणी करता येणार असून, व्हॉटस्‌ ॲप, ई- मेलद्वारे नागरिकांना बिल प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तब्बल २ लाख १२ हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. घरगुती नळ कनेक्शन धारकांना दर दोन महिन्यांनी, तर व्यावसायिक नळ कनेक्शन धारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जाणे आवश्यक आहे. सध्या पाणीपट्टी विभागाला ३५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फक्त ९६ कर्मचाऱ्यांवर बिल वाटपाची धुरा असल्याने पाणीपट्टीची देयके वर्ष- वर्ष वाटप केली जात नाहीत. काही ग्राहकांना तर पाच ते सात वर्षे उलटली तरी पाणीपट्टीची देयके मिळू शकलेली नाहीत.

१३५ कोटी थकीत

पाणीपट्टी विभागाला ३५० कर्मचाऱ्यांची गरज असून, प्रत्यक्षात ९६ कर्मचारी आहेत. सध्या एक कर्मचारी पाणी मीटर रीडिंग घेउन कार्यालयात येतो. त्यांचे बिल तयार करून पुन्हा संबंधितांच्या घरी बिल घेऊन जातो. यासाठी एक कर्मचारी दिवसांत जेमतेम २७ बिल करू शकतो. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी १३५ कोटीवर पोचली आहे, मात्र मोबाईल ॲपमुळे ग्राहक स्वतः त्यांच्या मीटरचे रीडिंग घेऊन ॲपवर टाकू शकतात. त्यानंतर तासाभरात मनपा संबंधित रीडिंगची खातरजमा करून तासाभरात पुन्हा ग्राहकाच्या मोबाईलवर किंवा मेलवर बिल पाठवून देतील. त्यामुळे ग्राहक कुठल्याही ऑनलाइन पेमेंटद्वारे बिल भरू शकतील.

पाणीपट्टीधारक संख्या

१,९३८७२ घरगुती ग्राहक

३५८६ बिगर घरगुती

३८३७ वाणिज्यक

ॲपचे फायदे

  • तीन वर्षे बिलच न मिळणाऱ्यांची सुटका

  • संगणकावर रीडिंग पाहून मोबाईलवर बिल

  • पेपरलेस कामकाजामुळे घरबसल्या बिल भरणा

  • ऑनलाइन बिल भरल्यास सवलत मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com