
नाशिक : राज्यात वारंवार पेपरफुटीची प्रकरणे समोर येत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा मंडळ हतबल झाले आहे. मंगळवारी (ता. १०) तातडीची बैठक घेत ११, १३ आणि १९ डिसेंबरला होणाऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका संबंधित परीक्षा केंद्रांना ई-मेलद्वारे पाठविण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना वाढीव वेळ दिली जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांमध्ये गेल्या आठ दिवसांत पेपरफुटीच्या तीन घटना उघडकीस आल्या.