
गोदावरी पुनरुज्जीवनासाठी 'बांबू लागवड' पर्याय
नाशिक : गोदावरी पुनर्जीवनासाठी बांबू लागवड अतिशय चांगला पर्याय आहे. गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला बांबूची लागवड हा शहरातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करीत पर्यावरण आणि तापमानाची पातळी राखण्यासाठी समर्थ पर्याय आहे, असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांनी केले. भाजपच्या वंसतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते शनिवारी बोलत होते. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, जगन पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
श्री. पटेल म्हणाले, की जगभर तापमानवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. पृथ्वीची तापमानवाढ अशीच सुरू राहिल्यास येत्या २०५० पर्यत मुंबईसह बारा शहरे पाण्याखाली जाणार आहेत. भूगर्भातील कोळसा, डिझेल, पेट्रोलसह इंधनाच्या बेसुमार उत्खनानामुळे हे घडते आहे. वीजनिर्मितीसाठी बेसुमार कोळसा उत्खनन सुरू आहे. एक किलोग्रॅम कोळशाच्या ज्वलनातून साधारण २८०० ग्रॅम कार्बन तयार होतो. कोळसा, डिझेल, पेट्रोल या भूगर्भातील उत्खनानावर नियंत्रण आणल्याशिवाय हे शक्य नाही. ऊर्जा निर्मितीसाठी बांबू लागवड हा समर्थ पर्याय आहे. एका बांबूच्या झाडापासून सुमारे ३२० किलो प्राणवायू मिळतो. एक एकरावर बांबू लागवड केल्यास २ लाखापर्यंत शासनाकडून अनुदान मिळते. त्यामुळे भविष्यात बांबू लागवडीतून इंधनाचे स्रोत निर्माण करण्याची गरज आहे.
व्यावसायिक, उद्योजकांनी पुढे यावे
गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावर बांबूची लागवड केल्यास गोदावरी जैव संतुलन राखता येईल. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळेल. पण त्यासाठी गोदावरीच्या दोन्ही तीरालगतच्या गावातील बांबू लागवड वाढावी. गोदावरी तीरावर बांबू लागवडीसाठी या भागातील शेतकरी, व्यावसायिक व उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
Web Title: Nashik Bamboo Plantation Godavari Revival Fuel Resource Creation Need Patel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..