नाशिकचा उन्हाळ कांदा खाणार ‘भाव'' | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन लाल कांद्याची आवक वाढेपर्यंत उन्हाळ कांदा खाणार ‘भाव'
नवीन लाल कांद्याची आवक वाढेपर्यंत उन्हाळ कांदा खाणार ‘भाव''

नवीन लाल कांद्याची आवक वाढेपर्यंत उन्हाळ कांदा खाणार ‘भाव''

नाशिक : ‘बफर स्टॉक’चा कांदा विक्रीसाठी आणणे, कांद्याची आयात करणे, अशा विविध उपाययोजना कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र दक्षिणेसह राजस्थानमधील कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे नाशिकचा उन्हाळ कांदा ‘भाव’ खाणार आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर कांद्याचे लिलाव सुरू झाले असून, क्विंटलचा सरासरी भाव दोन हजार ८०० ते दोन हजार ९५० रुपयांपर्यंत पोचला. मुंबईत बुधवारी (ता. १०) क्विंटलला सरासरी भाव तीन हजार रुपये मिळाला. बोगस बियाणे, प्रतिकूल हवामान, अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप कांद्याचे नुकसान झाले.

सहा ते सात महिन्यांपासून साठवलेल्या उन्हाळ कांद्याचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांदा आयातीला परवानगी दिली. त्यामुळे किलोला ५० रुपये भाव मिळणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे कांद्याची आयात केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव, गाळा क्रमांक, मोबाईल क्रमांक, छायाचित्र, अशी माहिती सोशल मीडियातून उपलब्ध करलन देण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना कांदा विक्री करायची नाही, अशी विनंती शेतकऱ्यांना केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई : औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव

नाकाला कांदा लावायचा काय? बाजारपेठेतून ‘नाफेड’च्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांदा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय कांद्याची आयात होत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील भावाची स्थिती काय राहणार, याची माहिती घेतल्यावर ‘बफर स्टॉक’मधील आणि आयात केलेला कांदा नाकाला लावायचा काय, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करत व्यापाऱ्यांनी हा कांदा पुरेसा ठरणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटकमधील बाजारपेठेतील कांद्याची आवक कमी आहे. त्यातच निम्म्याहून अधिक कांदा खराब निघत असल्याची माहिती नाशिकच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. राजस्थानमधील लाल कांद्याची आवक सुरू असली, तरीही हा कांदा १५ डिसेंबरपर्यंत विक्रीसाठी येईल. राजस्थानचा कांदा दिल्ली, हरियाना, गुजरातच्या ग्राहकांसाठी विकला जात आहे.

गुजरातमधील नवीन कांदा २० डिसेंबरपर्यंत बाजारात येण्यास सुरवात होईल. शिवाय नाशिकचा नवीन लाल कांदा आवक वाढण्यासाठी आणखी महिन्याहून अधिक कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत देशातील ग्राहकांसाठी नाशिकच्या उन्हाळ कांद्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे. एव्हाना ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचल्याने साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र व्यापाऱ्यांना पाहावयास मिळत आहे. पिंपळगावला २ हजार ८०० चा भाव व्यापाऱ्यांच्या संपामुळे पिंपळगाव बसवंतच्या बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे, हे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून जाणून घेण्यात आले. एरव्ही जिल्ह्यातील इतर बाजारपेठांपेक्षा अधिकचा भाव पिंपळगावमध्ये मिळतो, असा अनुभव जमेस आहे. व्यापाऱ्यांच्या संपाची माहिती नसल्याने विक्रीसाठी आलेल्या कांद्याची विक्री झाली. त्यास सरासरी २ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

इन्फोबॉक्स कांद्याच्या भावाची स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) लासलगाव- २ हजार ८८० मुंगसे- २ हजार ७५० देवळा- २ हजार ८०० मनमाड- २ हजार ५०० सटाणा- २ हजार ९५० वणी- २ हजार ९००

loading image
go to top