Latest Marathi News | आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणाची नाशिक भाजप महिला आघाडीकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News

Nashik Crime News : आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणाची नाशिक भाजप महिला आघाडीकडून दखल

नाशिक : म्हसरुळ येथील आदिवासी मुलींच्या अत्याचारप्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक बाबी समोर येत असून, द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाला धर्मादाय आयुक्तांकडील (चॅरिटी कमिशनर) संस्था नोंदणीचीच फक्त परवानगी असल्याचे उघड झाले आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या या निवासी संस्थेसाठी आदिवासी विकास विभाग, समाज कल्याणच्या महिला व बाल कल्याण विभागाचीही परवानगी नसल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. या साऱ्यांची नाशिक शहर भाजप महिला आघाडीतर्फे गंभीर दखल घेण्यात आली असून सोमवारी (ता.२८) जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांच्याकडे शहरासह राज्यभरात सुरू असलेल्या अशा संस्थांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. (Nashik BJP Mahila Aghadi Takes Note of Case of Atrocities on Tribal girls Collector Charity Commissioner to take strict actiondemand Nashik Crime News)

हेही वाचा: Nashik News : पोलिस भरतीचे Server Down; दोन दिवसांवर अंतिम मुदतीमुळे उमेदवारांना मनस्ताप

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात लहान मुलांसाठीच्या दोन संस्थांमध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथील आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा खुनाची घटना ताजी असतानाच, म्हसरुळ येथील आदिवासी वाड्या-पाड्यावरील शिक्षणासाठी आलेल्या सहा मुलींवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.

या दोन्ही संस्थांना आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभागाच्या महिला व बाल कल्याण समिती, बाल हक्क संरक्षण समिती यासह विविध विभागांच्या परवानगी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

याची गंभीर दखल महाराष्ट्र भाजप महिला आघाडीने घेतली आहे. आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोशल माध्यमावरून याप्रकरणी संस्थाचालकावर कठोर कारवाईची मागणी करतानाच, नाशिक शहर भाजप आघाडीला त्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहर आघाडीच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २८) धर्मादाय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहर-जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील अशा प्रकारे सुरू असलेल्या संस्थांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News : निफाडच्या संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात तरुणांची काकसेवा!

संशयित मोरेची सासू अनभिज्ञ

म्हसरूळच्या मानेनगरमध्ये संशयित मोरे याने डुप्लेक्स रो-हाउस भाड्याने घेतले होते. याठिकाणी १३ मुली निवासी आहेत. मुलांसाठी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था होती. मुलींच्या ठिकाणी मोरे याची सासूही राहायची. परंतु ती या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून मोरे याठिकाणी राहावयास आला होता. याच काळात त्याने मुलींचे आश्रमासह वीरगाव (ता. सटाणा) येथे नेऊन लैंगिक शोषण केल्याचे तपासातून समोर आले आहे. पेठरोडवरीलच तवली फाटा येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या संस्थेत तो यापूर्वी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने सदरील आश्रम सुरू केला. मूळचा सटाणा येथील रहिवासी असलेल्या मोरे हा ड्रोन तयार करण्याचे काम करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

आश्रम अनधिकृत; संस्था नोंदणीचीच परवानगी

द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमासाठी संशयित मोरे याच्याकडे धर्मादाय आयुक्तांकडून संस्था नोंदणीचा परवाना आहे. याशिवाय आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभागाच्या महिला व बाल कल्याण समितीसह अन्य विभागांची अत्यावश्‍यक असलेली कोणतीही परवानगी पोलिस तपासात मिळून आलेली नाही.

हेही वाचा: Nashik News : अभोण्याला उमाबाई दाभाडेंच्या कर्तृत्वाचे ‘कोंदण’

आश्रमशाळांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक शहरातील सुरू असलेल्या आधार आश्रमांची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व या आधार आश्रमांनी शासनाची योग्य अशी परवानगी घेतली नसल्यास ते आधार आश्रम बंद करण्यात यावेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले तसेच छायाछत्र हरपलेली बालके यांची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे माजी नगरसेवक, सिडको विभाग सेक्रेटरी तानाजी जायभावे पक्षाचे शहर कमिटी सदस्य संतोष काकडे, मोहन जाधव, नागेश दुर्वे, राहुल गायकवाड यांनी निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.

"गुन्हेगारी घटना घडल्यानंतरच पोलिसांकडून अशा संस्थांविरोधात कारवाई होते. अशा घटना घडू नये यासाठी या स्वरूपाच्या संस्थांसाठी सर्वप्रकारच्या परवानग्या बंधनकारक असाव्यात. नियमित ऑडिट व्हावे तर, अशा घटनांना आळा बसू शकेल. यासाठी सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्तांची भेट घेणार आहोत."

- हिमगौरी आहेर-आडके, शहर अध्यक्ष, भाजप महिला आघाडी