पक्षी मानचिन्ह निवडीवरून नाराजी
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार; स्थानिक अभ्यासकांना सहभागी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : नाशिक शहराचा ‘शहर पक्षी’ निवडण्याच्या प्रस्तावावरून पक्षिमित्र आणि पर्यावरण अभ्यासकांमधील नाराजी वाढली असून, या निवड प्रक्रियेत स्थानिक पक्षी अभ्यासकांना विश्वासात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांमधूनच निवड करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत, या प्रक्रियेचा फेरविचार करावा, अशी मागणी पक्षिमित्रांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
नाशिक शहराचा ‘शहर पक्षी’ निश्चित करण्याचा उपक्रम चर्चेत आल्यानंतर पक्षिमित्र आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रक्रियेतील सहभागाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे. शहर पक्षी निवडणे ही केवळ दोन पर्यायांमधून एका पक्ष्याची निवड करण्याची प्रक्रिया नसून, शहरातील जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करणारा पक्षी निश्चित करण्याची संधी आहे. पक्षी निवडताना त्याची शहरातील उपस्थिती, स्थानिक अधिवासाशी असलेले नाते, पर्यावरणीय भूमिका आणि पक्षिसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याची क्षमता यांचा विचार व्हावा. निवडीचे निकष स्पष्ट करून प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यामध्ये पक्षिमित्र, पक्षी अभ्यासक, निसर्गप्रेमी संस्था आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना सहभागी करून घ्यावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात येणार आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याची तयारी पक्षिमित्रांनी केली आहे. या भूमिकेला नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष मधुकर जगताप, पक्षी अभ्यासक डॉ. अनिल माळी, सतीश गोगटे, निसर्गसेवक युवा मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उमेशकुमार नागरे, भीमराव राजोळे, विजयश्री सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर साठे, डॉ. सीमा पाटील, भारती जाधव, सीमा तंगडपल्ली, मंजूषा पत्की आणि पक्षी अभ्यासक डॉ. श्रीश क्षीरसागर आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.