नाशिक : एसटी संपामुळे सिटीलिंक मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik city bus service

नाशिक : एसटी संपामुळे सिटीलिंक मालामाल

नाशिक : महापालिकेकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंक बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, रोजचा महसूल दहा लाखांच्या वर पोचला आहे. परिणामी तोटा कमी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या संपाचा परिणाम असला तरी प्रवाशांनीदेखील खासगी प्रवास न करता सिटीलिंकलाच प्रतिसाद दिला आहे. विशेष करून शहरी भागापेक्षा दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्‍वर, भगूर, मखमलाबाद या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण देत महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानुसार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता असल्याने बससेवा महापालिकेने चालविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने ८ जुलैपासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच टप्प्यांमध्ये अडीचशे बस रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत ३९ मार्गांवर १२० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या असून, पुढील आठवड्यात आणखी चार नवीन मार्ग सुरू केले जाणार आहे. बसची संख्यादेखील वीसने वाढविली जाणार आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

पहिल्या टप्प्यात डिझेल व सीएनजी बस चालविल्या जात आहेत. ७२ रुपये प्रतिकिलोमीटर बस ऑपरेटर कंपन्यांना पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे एकावेळी सर्व बस सुरू करण्यात आल्या नाहीत. ऑक्टोबर महिन्यापासून राज्य शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बससेवेला मागणी वाढली. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीदेखील प्रवाशांची गर्दी असल्याने त्यातून रोजचा महसूल दहा लाखांच्या पुढे पोचला आहे. किलोमीटर मागे सिटीलिंक कंपनीला सुमारे ५२ रुपये मिळतात. संपूर्ण बस रस्त्यावर उतरविल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढून तोटा सहजपणे भरून निघेल, असा दावा केला जात आहे.

संपामुळे ग्रामीण भागातून मागणी

गेल्या वीस दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी ग्रामीण भागात खासगी बससेवेला परवानगी देण्यात आली असली तरी या भागात सिटीलिंकच्या बससेवेलाच अधिक पसंती मिळत आहे. दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्‍वर, भगूर, मखमलाबाद या भागातून अधिक मागणी वाढली आहे.

loading image
go to top