esakal | Nashik Corporation : थकबाकी वाढीचा मनपात नवा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

nashik municipal corporation

Nashik Corporation : थकबाकी वाढीचा मनपात नवा विक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सवलत जाहीर करूनही करदात्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने घर व पाणीपट्टी थकबाकी वाढीचा महापालिकेत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. १२२. ८३ कोटी रुपये पाणी, तर ३६५. ४० कोटी रुपये घरपट्टी, असे एकूण ४८८. २३ कोटी रुपये थकबाकीचा डोंगर तयार झाला आहे.

राज्य शासनाकडून महापालिकेला जीएसटीच्या स्वरूपात अनुदान प्राप्त होते. त्यापाठोपाठ घर व पाणीपट्टी हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. परंतु, कोरोनामुळे करवसुली अपेक्षित प्रमाणात होत नाही. मागील वर्षातदेखील घर व पाणीपट्टी अपेक्षित वसुल झाली नाही. या वर्षीदेखील पहिल्या सहा महिन्यात कर वसुलीला फटका बसला आहे. करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून घरपट्टीकरिता सवलत योजना अमलात आणली. एक रक्कमी घरपट्टी अदा करणाऱ्यांना पाच टक्के, ऑनलाइन करदात्यांना एक टक्का अतिरिक्त सवलत जाहीर करण्यात आली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर थकबाकी वसुलीसाठी महापालिका विविध कर विभागाने ऑगस्ट महिन्यापासून अभय योजना लागू केली. या योजनेंतर्गत घरपट्टीच्या थकबाकीच्या रकमेवरील व्याज व नोटीस खर्चात ९० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, त्या योजनेलाही प्रतिसाद मिळाला नाही. घरपट्टीसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी मागील थकबाकीची जेमतेम ५. ९६ टक्के, तर चालू ३७.९४ टक्के वसुली झाली आहे. पाणीपट्टीची मागील थकबाकी १८. ९२ टक्के, तर चालू १३. ०४ टक्केच वसुली झाल्याने थकबाकीचा डोंगर वाढताना दिसत आहे. घरपट्टीच्या ३६५. ४० कोटी रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी पश्चिम विभागात ४७. ८९ कोटी, सातपूर विभागात ३०. ७२ कोटी, सिडको विभागात ५४.८९ कोटी, पूर्व विभागात ७९. ५८ कोटी, पंचवटी विभागात ८७.०६ कोटी, तर नाशिक रोड विभागात ६५.२६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी अभय योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू असल्याने डिसेंबर महिन्यात वसुली अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिलवाटप रखडले

विविध कर विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप रखडले आहे. पहिल्या फेरीतील ५७ हजार ७४८ बिलांचे वाटप अद्याप झालेले नाही. दुसऱ्या फेरीतील १७ हजार ६४८ देयकांचे वाटप प्रलंबित आहे. पाणीपट्टीची थकबाकी १२२. ८३ कोटींवर पोचल्याने २५ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरी जाऊन पाणीपट्टी वसुलीच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

loading image
go to top