आकाशचे शतक; निर्वाण, अगस्त्य अष्टपैलू
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत शिवमचे चार बळी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत आकाश पाठकने जोरदार शतक झळकवले. तर निर्वाण सिंग दुहेलाने अर्धशतक व २ बळी आणि अगस्त्य मोरे याने ४५ धावा व २ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजीत मध्यमगती शिवम केवटने ४ बळी घेऊन चमक दाखवली.
दोन दिवसीय कसोटी स्वरूपात स्पर्धेतील सामने होत आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रात विविध ठिकाणी सुरू आहे. पुणे येथे झालेल्या पूना क्लब विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या निर्वाण सिंग दुहेला व अगस्त्य मोरेनेने अष्टपैलू कामगिरी केली. निर्वाणने पहिल्या डावात सलामीला खेळत ५६ व दुसऱ्या डावात ३० धावा केल्या. अगस्त्यने पहिल्या डावात ४५ धावा केल्या. नाशिकच्या पहिल्या डावातील १८८ धावांना पूना क्लबने २११ धावा करून उत्तर दिले. नाशिकतर्फे मध्यमगती शिवम केवटने ४ व निर्वाण सिंग दुहेलाने २ तर फिरकीपटू अर्णव फड व अगस्त्यने प्रत्येकी २ गडी बाद केले. सामना संपेपर्यंत नाशिकने दुसऱ्या डावात १ बाद ५३ धावा झाल्या. अनिर्णीत सामन्यात पूना क्लबने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. उत्तर विभाग विरुद्ध सहारा क्रिकेट ॲकॅडमी सामन्यात नाशिकच्या आकाश पाठकने दुसऱ्या डावात जोरदार शतक झळकवले. उत्तर विभाग संघाकडून खेळताना आकाश पाठकने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत पहिल्या डावात २३ तर दुसऱ्या डावात ११० चेंडूत १७ चौकार व एक षटकार यांसह १०३ धावा फटकवल्या. तसेच मध्यमगती गोलंदाजीने सहाराचे दोन बळीही घेतले. उत्तर विभागाच्या पहिल्या डावातील १०५ धावांना सहारा क्रिकेट अकॅडमीने विहान डेच्या १५१ धावांच्या जोरावर ८ बाद ३१४ असे जोरदार उत्तर दिले. व मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आकाशच्या शतकामुळे उत्तर विभागाच्या २०३ धावा झाल्या. तरीही सहारा क्रिकेट ॲकॅडमीने १ डाव व ६ धावांनी सामना जिंकला.