दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्याला ४.२७ लाख क्विंटल धान्याचा आधार!
३६.६२ लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य; स्थलांतरित मजुरांसाठी ‘पोर्टेबिलिटी’ सुविधेची अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी चार लाख २७ हजार ४०० क्विंटल धान्य मंजूर केले आहे. जिल्ह्यातील ३६ लाख ६२ हजार लाभार्थ्यांना या धान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त दहा तालुक्यांतील रोजगार किंवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना ‘पोर्टेबिलिटी’ सुविधेद्वारे धान्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळाची ‘ट्रिगर-१’ अवस्था जाहीर झाली आहे. या तालुक्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ आणि ज्वारीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. स्थलांतरित लाभार्थ्यांनाही रास्तभाव दुकानांमधून धान्य घेता यावे, यासाठी पोर्टेबिलिटी सुविधेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींनी धान्याची मागणी केल्यास त्यांच्या उत्पन्नाची आणि उपलब्ध इष्टांकाची शासनाच्या निकषांनुसार पडताळणी करण्यात येईल. पात्रतेनुसार त्यांचा अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेश केला जाणार आहे.
दोन महिन्यांसाठी धान्यसाठा उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय गुदामांची एकूण साठवण क्षमता पाच लाख आठ हजार ८८० क्विंटल आहे. मंजूर नियतनापैकी दोन लाख २६ हजार ८२० क्विंटल धान्याची उचल पूर्ण झाली आहे. उर्वरित धान्याची उचल वेळेत पूर्ण करून रास्तभाव दुकानांमार्फत पात्र लाभार्थ्यांना त्याचे नियोजनबद्ध वितरण करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.
कोट
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना वेळेत आणि सुरळीत धान्यपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. कोणतेही पात्र कुटुंब धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी