Nashik Lok Sabha Election : चर्चा नाराजीची मात्र निवडणूकीचा माहोल फिफ्टी-फिफ्टीचा!

Lok Sabha Election : येवला-लासलगाव मतदारसंघात यावेळी मात्र भाजपाला मागील तीन निवडणूकीसारखे मोकळे मैदान नक्कीच नसल्याची स्थिती आहे.
Bharati Pawar, Bhaskar Bhagare
Bharati Pawar, Bhaskar Bhagareesakal

येवला : लोकसभा निवडणुकीला भाजपचा बालेकिल्ला तर विधानसभेला मात्र राष्ट्रवादीचे वर्चस्व आणि संमिश्र कौल देणाऱ्या येवला-लासलगाव मतदारसंघात यावेळी मात्र भाजपाला मागील तीन निवडणूकीसारखे मोकळे मैदान नक्कीच नसल्याची स्थिती आहे. विद्यमान खासदारांविषयी कांदा बाजारभावासह संपर्काच्या अभावामुळे नाराजीची चर्चा असली तरी पंतप्रधान मोदींसह भाजपाला मानणारा मोठा वर्ग असल्याने ही जमेची बाजू दिसते. (Lok Sabha Election)

तर दुसरीकडे शरद पवार गट सहानुभूतीच्या लाटेवर स्वार असून मतदारसंघातील सर्वच प्रमुख नेते कामाला लागले आहेत. या सर्व परिस्थितीत फिफ्टी-फिफ्टीचा कल सध्या मतदारसंघात दिसत आहे. मुळात येवला-लासलगाव हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार असलेला आहे.

फक्त येवला शहरावर पूर्वीपासून जनसंघाचे वलय राहिलेले असून आजही भाजपला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. असे असले तरी संपूर्ण मतदारसंघाने लोकसभेला भाजपला तर विधानसभा व इतर निवडणूकीत राष्ट्रवादीला समर्थन दिल्याचा राजकीय इतिहास राहिला आहे. विधानसभेला राष्ट्रवादीला लाखाच्या आसपास मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघाने लोकसभेला मात्र भाजपला २०१४ मध्ये ५३ हजार तर २०१९ मध्ये २८ हजाराचे १२० मताधिक्य दिले आहे.

● तीन टर्म पेक्षा वेगळी स्थिती..!

२००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत येथून भाजपला लीड मिळाले आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांशी सलोखा ठेवल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने भाजपला मताधिक्य मिळाले होते. मात्र, २०१९ ला डॉ.भारती पवार उमेदवार झाल्यावर येथील लीड घटलेले पाहायला मिळाले. यावेळी तर पूर्णतः विरोधाभासाचे चित्र असून ग्रामीण भागाला कांदा निर्यातबंदीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचा रोष पवारांना सहन करावा लागत आहे.

गावोगावी कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करीत असल्याने भाजपला यावेळी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. अर्थात भाजपा व मोदी नावाला मानणारे शहरी मतदार ही जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे नवखे असूनही अनेकांना भावले आहेत. त्यातच स्वतः पवार, राष्ट्रवादीसह ठाकरे शिवसेनेची ताकद मतदारसंघात असल्याने त्याचा किती फायदा होतो हे पाहणे लक्षवेधी ठरेल. (Latest Marathi News)

Bharati Pawar, Bhaskar Bhagare
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

● स्थानिक नेतेही रिंगणात

डॉ.पवारांच्या प्रचाराची धुरा सध्या भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांभाळत आहेत. त्यांच्या प्रचारात नेत्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाची उणीव जाणवत आहे. यावेळी गेले दोन दिवस उमेदवार भगरे स्वतः पूर्ण मतदारसंघात फिरले आहेत. विशेष म्हणजे, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील.

आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, युवा नेते संभाजीराजे पवार, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, युवा नेते संजय बनकर, शाहु शिंदे हे प्रमुख नेतेच प्रचारात उतरलेले दिसले. नेत्यांनी आपली निवडणूक समजून जबाबदारी स्वीकारल्याने याचा फायदा राष्ट्रवादीला होईल.

● सभा फिरवणार समीकरण

प्रचारात भेटीगाठी सुरू असल्या तरी अद्याप सभांची उणीव जाणवत असून निवडणूक शांतशांत आहे. कांद्याच्या प्रश्नावर नाराजी असली तरी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या सभाही निर्णायक ठरू शकतील. तिकडे भगरेंना मात्र शरद पवार यांचीच सभा लाभदायी ठरेल .त्यामुळे या सभांकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

● पवारांची ताकद दिसणार

मराठा समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ असून त्यातही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. पक्ष फुटीनंतर येवला व निफाडच्या सभेत हे चित्र दिसले आहे. त्यामुळे सभा झाली तर ठीक नाहीतर फोन-मेसेजवर देखील पवारांची पॉवर येथे दिसेल हे नक्की!

Bharati Pawar, Bhaskar Bhagare
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

● भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

आजपर्यंत पवारांच्या प्रचारात भुजबळ व टीम सक्रीयपणे दिसून आलेली नाही. मात्र बुधवारी भुजबळ येवला दौऱ्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे. येथील अनेक निवडणूका भुजबळ नावावर होत असून भुजबळांना मानणारा वर्ग व ओबीसींचे मोठे प्राबल्य येथे असल्याने भुजबळांचा मोठा फायदा भाजपला होऊ शकेल.

● मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे पाटील व भुजबळ संघर्ष जगजाहीर होता. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्यातच सत्ताधारी पक्षाने आरक्षण न दिल्याची खदखद समाजाच्या मनात आहे. त्यामुळे हा मुद्दा देखील राजकारणावर प्रभाव टाकेल असे सांगितले जाते.

● हे आहेत प्रमुख प्रश्न...

√ कांद्याची निर्यातबंदी व पडलेले भाव

√ मांजरपाडा योजनेचे पाणी

√ पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा

√ शहर व तालुक्यातील पिण्याची पाणीटंचाई

√ औद्योगिक वसाहतीचे रखडलेले काम

√ नाशिक-औरंगाबाद महामार्ग व प्रमुख रस्त्यांकडे दुर्लक्ष

√ समक्ष व परिपूर्ण आरोग्य सुविधेचा वानवा

√ शहरातील वाहतुकीची कोंडी

● एवढे आहेत मतदार...

पुरुष - १६३५०५

स्त्री - १४८७४६

तृतीय पंथी - ५

एकूण - ३१२२५५

● यापूर्वी काय झाले....

२०१४ -

भाजपा - १०२९०२

राष्ट्रवादी - ४९८८९

२०१९

भाजपा - ९५७०९

राष्ट्रवादी - ६७५८९

Bharati Pawar, Bhaskar Bhagare
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com