Nashik Heavy Rain Update : येवल्यात ढगफुटी!; 3 तासांत १०३ मिमी पाऊस! | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shanipatangan bajar area

Nashik Heavy Rain Update : येवल्यात ढगफुटी!; 3 तासांत 103 मिमी पाऊस!

येवला (जि. नाशिक) : येवला शहर व परिसरात गुरुवारी पहाटे दोननंतर तीन तासांवर पावसाने थैमान घातल्याने बसस्थानक, शनिपटांगण, इंद्रनील कॉर्नरसह शहराची मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली. यामुळे पूर्ण व्यापारपेठ व भाजीबाजारातील १०० वर दुकानांत तर ५० हून अधिक घरांत पाणी घुसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील पाणी वाहून जाणारे नालेच हळूहळू गिळंकृत होऊन छोटे होऊ लागल्याने ही वेळ आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान मध्यरात्री दोननंतर अवघ्या तीन-साडेतीन तासात शहरात तब्बल १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Nashik Heavy Rain Update Cloud burst at yeola 103 mm rain in 3 hours Nashik Latest Marathi News)

बुधवारी दिवसभर उघडलेल्या पावसाने मध्यरात्री दोननंतर अचानक रौद्ररूप धारण करून हजेरी लावली. अक्षरशः धोधो कोसळणारा पाऊस आणि कडाडणाऱ्या विजांमुळे भीतीचे वातावरण झाले होते. या पावसामुळे शहरालगतच्या नांदूर, सुकी भागातील बंधारे ओव्हरफ्लो होऊन सर्व पाणी वाहून शहराच्या दिशेने आले.

त्यातच शहरातील पाणी वाहून जाणारा हुडको नाल्यात पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्याने तसेच शहरातील गंगासागर तलावाच्या दिशेकडून मोठ्या प्रमाणात पाणी शहराकडे येत असल्याने अमरधाम, बसस्थानक, शनिपटांगण, इंद्रनिल कॉर्नर, बजरंग मार्केट, गणेश मार्केट, मेनरोड परिसरातील शंभरावर दुकानात पाणी घुसून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरूवारी दोनपर्यत पाणी तसेच

पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची रुंदीच हळूहळू कमी होऊन लागल्याने सलग दुसऱ्या वर्षीही आपत्ती ओढवली आहे. त्यातच उपाययोजना व पर्याय उपलब्ध नसल्याने पहाटे पाचच्या सुमारास आलेले पाणी आज दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत तुंबलेले होते. यामुळे संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. भाजीबाजाराची पूर्णतः वाट लागलेली दिसली. ऐन दिवाळीत ही आपत्ती ओढल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Nashik : बिजोरसे- नामपूर रस्त्याची दैना; काटेरी बाभळींमुळे साईडपट्ट्याही लुप्त

दुकानांमध्य पाणीच पाणी...

शहरातील पाणी वाहून नेणारा हुडको नाला अरुंद झाला असून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढल्याने या नाल्यातून पाणी वाहून जाणे मुश्कील झाले. त्यातच काही ठिकाणी पाणी अडकल्याचेही सांगितले जात आहे. वरच्या दिशेने गंगासागर तलावाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून बसस्थानकाकडून शहरात घुसले. या भागातील बसस्थानक, माधवराव पाटील संकुल, शनिमंदिर, इंद्रनिल कॉर्नर परिसरातील गणेश मार्केट, बजरंग मार्केट भागातील प्रत्येक दुकानात पाणी घुसले होते. मेन रोडला देखील पाणी जाऊ लागले होते. यामुळे अनेक व्यावसायिकांचा माल ओला होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. भरपाण्यात अनेक व्यावसायिक आपला दुकानातील माल पाण्यातून वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.

पाबळे गल्लीत घरात पाणी

लककडकोट तसेच पुढे बुरूड गल्लीच्या मागील पाबळे गल्लीतील प्रत्येक घरात पाणी घुसले. यामुळे एका कारागिराचा हातमाग तर इतर कुटुंबीयांचे कपडे, धान्य देखील ओले होऊन गेले. पाण्यात उभे राहून रात्र काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. घरात पाणी घुसल्याची स्थिती हुडको कॉलनी भागातही पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे या भागातील नागरिकांचा रोष पाहावयास मिळाला. नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने ठिकठिकाणी रस्ते व

नाले उकरून पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे अक्षरशः नगर-मनमाड महामार्गावरून देखील दुपारपर्यंत नदी सारखे पाणी वाहताना दिसले. शहराचा विस्तार पाहता वाहून जाणारा नाला अपुरा पडत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. यावर कायमस्वरूपी पर्याय शोधण्याची मागणी नागरिकांनी आज केली.

हेही वाचा: Nashik Crime News : भर दिवसा गाडीची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास