
जुने नाशिक : बागवानपुरा येथील संत कबीर नगर झोपडपट्टीला शनिवारी (ता.६) भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीत आठ घरे जळून राख झाली. दरम्यान, दोन चिमुकल्यांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. अग्निशामक पथक वेळेवर पोचल्याने मोठा अनर्थ टळला. (Latest Marathi News)
संत कबीर नगर येथील एका घरास शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आग लागली. परिसरात खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी संपूर्ण परिसराला सतर्कतेचा इशारा दिला. आठही घरातील कुटुंब बाहेर पळाले. दाट वस्ती असल्याने बघता, बघता आठ घरे आगीच्या कचाट्यात सापडले. दरम्यान, विविध घरातील तीन सिलिंडर फुटल्याने मोठा भडका उडला. तरुणांनी आगीवर पाण्याचा मारा केला. अग्निशामक विभागास माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दाट वस्ती असल्याने अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाण्याचे पाइप आत नेण्यास अडचण निर्माण झाली. तरुण आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी आत पाइप नेत आगीवर जोरदार पाण्याचा मारा केला.
दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आले. असे जरी असले तरी काही घरांमध्ये किरकोळ स्वरूपाची आग असण्याची शक्यता असल्याने काही बंब अधिक वेळ पाण्याचा मारा करत घटनास्थळी थांबून होते. चार ते पाच बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. तीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकल्याचे सांगण्यात आले. आगीत आठही कुटुंबीयांची हजारोची रक्कम आणि संसार राख झाली. परिसरातील तरुण चिमुकले देवदूत आणि अग्निशामक विभागाच्या प्रयत्नाने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. चांदबी रहीम शेख, समिना सलीम शेख, रज्जाक शेख, हाजी जाफर अत्तार, सलीम हनिफ खान, मुमताज महबूब बागवान, मदिना सादिक शेख, सलमा मेहबूब सय्यद यांची घर आगीत खाक झाली.
...आणि इच्छुक प्रकटले
येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका होऊ घातले आहे. यात अनेक इच्छुक आपले नशीब आजमावणार आहेत. त्यानिमित्त घटनेची माहिती मिळताच सर्वच पक्षाचे अपक्ष नशीब आजमावणारे इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी दाखल होत आश्वासनाची खैरात केली. दरम्यान, बोहरी समाज बांधवांची सैफी ॲम्बुलन्स कॉरप्स प्यारा मेडिकल फोर्स त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतीसाठी हातभार लावला. घटनेची माहिती घेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून ठेवली.
''आम्ही सर्व घरात बसलो होतो. दोन चिमुकले धावत आले, घरांना आग लागली आहे बाहेर निघा असे म्हणत ओरडत सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे आमचे सर्वांचे प्राण वाचले. जणू हे दोन्ही चिमुकले आमच्यासाठी देवदूत सारखे धावून आले.'' - इम्रान खान, पीडित
''अग्निशामक बंब वेळेवर घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश आले. अन्यथा दाट लोकवस्ती असल्याने संपूर्ण झोपडपट्टी आगीच्या कचाट्यात सापडून मोठा अनर्थ घडला असता.'' - बबलू शेख, सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.