Inspirational Story : थरथरत्या हातांच्या आधार बनल्या सुमनताई

Nashik News : नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात असलेल्या संत कबीरनगरमधील केवळ दुसरी पास झालेल्या सुमनताई शिंदे खचलेल्या मनांसाठी आधार ठरल्यात.
Suman Shinde
Suman Shindeesakal

माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात येणारे चढ-उतार नक्कीच आयुष्यासाठी प्रेरणा देणारे असतात. हा प्रवास पुढे जाताना वार्धक्य प्रत्येकाच्याच वाट्याला ठरलेलं असतं. अशा काळात थरथरत्या हातांना मिळणारा आधार जगणं सुंदर करत असतो. परिस्थितीमुळे धुणी-भांडी करण्याची वेळ आली. प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात धुणी-भांडी करण्यापासून सुरू झालेला प्रवास थेट थरथरत्या हातांसाठी आधार बनला. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात असलेल्या संत कबीरनगरमधील केवळ दुसरी पास झालेल्या सुमनताई शिंदे खचलेल्या मनांसाठी आधार ठरल्यात. (nashik Inspirational Story suman shinde news)

इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील माहेर आणि नाशिकच्या संत कबीरनगरमधील सासर असलेल्या सुमन बबन शिंदे यांचे वडील जगन्नाथ पुंजाजी रंधवे यांचे पत्नी मीराबाई यांच्यासह सात जणांचं कुटुंब. सुमनताई कुटुंबात ज्येष्ठ. अवघ्या सात वर्षांच्या असतानाच आजारपणामुळे वडिलांचं छत्र हरपलं. कुटुंबाची जबाबदारी आईवर येऊन पडली.

मीराबाईंची जबाबदारी मोठी

दोन्ही मुलींसाठी आधार झालेल्या आई मीराबाई रंधवे यांनी मुलींसह थेट नाशिक गाठले. नाशिकच्या संत कबीरनगर येथे भाड्याच्या झोपडीवजा घरात राहताना पडेल ती कामे करत होत्या. कुटुंबाचा गाडा ओढताना जबाबदारी कमी करण्यासाठी आईने लवकर लग्न करून दिल्याने सुमनताईंसाठीही पुढचा प्रवास खडतर सुरू झाला.

गरिबी पाचवीलाच पुजलेली

सुमनताईंचा विवाह गुळवत (निमगाव) येथील बबन शिंदे यांच्याशी झाला. बबन यांचेही शिक्षण जेमतेम आठवी. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत हंगामी कामगार म्हणून ते काम करत होते. सासरची परिस्थितीही जेमतेम असल्याने रोजचा दिवस आव्हाने घेऊन येणारा ठरला. सुमनताई यांनीही कॉलेज रोड परिसरात धुणी-भांडी करायला सुरवात केली.

त्यांचा प्रामाणिकपणा आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे या परिसरातील कुटुंबांना त्यांनी आपलेसे केले. पतीचा तुटपुंजा पगार आणि सुमनताई यांची कमाई यातून कुटुंबाला आधार होत असतानाच तीन मुलांमुळे कुटुंबाची संख्याही वाढली. (latest marathi news)

Suman Shinde
Inspirational Story : अंधत्वावर मात करीत मिळविली रेल्वेत नोकरी

समाजाची गरज ओळखली

धुणी-भांडी करताना कुटुंबातील नवजात बालके, तसेच ज्येष्ठ नागरिकांची गरज ओळखून सुमनताई यांनी नवजात बालके, तसेच बाळंतिणीची मसाज करण्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांची अंघोळ घालण्याची गरज ओळखली. सुमारे पंधरा ते वीस वर्षे धुणी-भांडी करण्याचे काम थांबवत त्यांनी कुटुंबातील लहान बालके, तसेच ज्येष्ठांसाठी सेवा देत त्या अनेक कुटुंबांसाठी आधार बनत गेल्या. नाशिकच्या वनविहार कॉलनीपासून ते थेट अशोक स्तंभ परिसरातील कुटुंबांसाठी सुमनताई ही सेवा पुरवीत आहेत.

हजारो हातांच्या बनल्या आधार

ज्येष्ठ नागरिकांना अंघोळ घालण्यापासून मालिश ते डायपर बदलण्याची मोलाची मानवसेवा सुमनताई करताहेत. आजपर्यंत हजारो ज्येष्ठ नागरिकांना आधार देतानाच संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबात सुमनताईंनी आपली भक्कम प्रतिमा निर्माण केली. नाशिक शहरात सुमनताईंनी दिलेल्या सेवेचा हजारो ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळालाय.

याशिवाय कुटुंबात जन्माला आलेल्या नवजात बालकांपासून ते बाळंतिणीसाठी मालिश ते अंघोळ घालण्याचेही काम त्या करतात. परदेशात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या नाशिकमधील आई-वडिलांसाठीही सुमनताईंचा आधार मोलाचा ठरतो आहे.

खचून जाऊ नका

आयुष्यातील आलेल्या परिस्थितीत खचून न जाता सुमनताई यांनी स्वतःची ओळख उभी करतानाच कुटुंबांसाठी दिलेला आधार नक्कीच महिलांसाठी प्रेरणादायी ठरलाय. सुमनताई ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत असतानाच पती बबन शिंदे यांनी शेळीपालन करत कुटुंबाला भक्कम केले आहे. परिस्थिती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांतून पुढे जात असतानाच महिलांनी खचून न जाता परिस्थितीला सामोरे जावे, हेही सुमनताई सांगायला विसरल्या नाहीत.

Suman Shinde
Inspirational Story : पानटपरीच्या आधाराने नात्याची वीण घट्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com